31.9 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रभुजबळांच्या अस्मितेला धक्का; राष्ट्रवादीतील अस्वस्थतेची पाच कारणे

भुजबळांच्या अस्मितेला धक्का; राष्ट्रवादीतील अस्वस्थतेची पाच कारणे

नाशिक : विशेष प्रतिनिधी
जहां नही चैना, वहां नही रहेना, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. आता छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा रंगली आहे. भुजबळ यांनी नागपूर अधिवेशन सोडून तडक नाशिक गाठले आणि आपल्या समर्थकांशी चर्चा सुरू केली. त्यामुळे भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. छगन भुजबळ नेमके नाराज का झाले? फक्त मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज आहेत का? कोणती अशी कारणे आहेत ज्यामुळे भुजबळ नाराज झाले? त्याविषयी हे विश्लेषण…

राज्यसभेला संधी नाकारली…
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली. राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार राज्यसभेवर जाणार होते. त्यामुळे भुजबळ यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले. दुस-या जागेवर नितीन पाटील यांना संधी दिली. त्यामुळे भुजबळ नाराज झाले होते.

लोकसभेची केली तयारी अन्…
भुजबळांच्या नाराजीचे दुसरे कारण म्हणजे त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे पक्षाने आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भुजबळांना नाशिकमधून लोकसभेवर निवडून आणा असे आदेश दिले. त्यामुळे तुम्हाला लोकसभा लढवावी लागेल, असे अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांना सांगितले. तसा दावा भुजबळांनी केला आहे. सुनील तटकरे यांनीही हे मान्य केलं आहे. भुजबळांनी लोकसभेची तयारीही केली. पण महिना झाला तरी त्यांच्या नावाची घोषणा होत नव्हती. याबाबत भुजबळांनी नेत्यांना विचारणा केली. पण त्यांना उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे निराश झालेल्या छगन भुजबळांनी लोकसभा लढणार नसल्याचे जाहीर केले.

उभे राहा, राजीनामा द्या..!
भुजबळ आणखी एका कारणाने प्रचंड दुखावले गेले. त्यांना येवल्यातून विधानसभा लढवण्यास सांगितले. भुजबळ लढण्यास फारसे इच्छुक नव्हते. पण तुमच्याशिवाय येवला नाही. त्यामुळे तुम्ही लढा असे सांगितले. भुजबळ लढले. निवडूनही आले. पण आता त्यांना परत राजीनामा द्यायला सांगितले आहे. तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या. कारण नितीन पाटील यांचे भाऊ मकरंद पाटील यांना निवडून आणायचे आहे. मकरंद यांना मंत्री करायचे आहे, असे भुजबळांना सांगण्यात आले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असेही त्यांना सांगितले. तेव्हा भुजबळ भडकले. मी आताच निवडून आलो आहे. आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी ती प्रतारणा ठरेल. त्यांना काय वाटेल? असे सांगत मी राजीनामा देणार नाही. हवे तर एक दोन वर्षानंतर राज्यसभेचे बघू, असे भुजबळ यांनी सांगितले. या प्रकारामुळे आपल्याला पक्ष खेळणी समजत असल्याची भावना भुजबळ यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच ते नाराज आहेत.

मंत्रिपद नाकारलं…
छगन भुजबळ हे सीनियर नेते आहेत. ते मंत्रिमंडळात हवेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितले. त्यानंतरही भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आल्याने भुजबळ दुखावले आहेत. मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठीच भुजबळ यांचा पत्ता कट केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही भुजबळ नाराज झाले आहेत.

निर्णय प्रक्रियेत वाव नाही…
अजित पवार हे आपल्याला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नसल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच सर्व निर्णय घेत असतात. मला विचारतही नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीत जेव्हा बंड झाले, अजितदादांनी जेव्हा वेगळा निर्णय घेतला, त्याची कल्पनाही मला नव्हती. पण सर्व एका बाजूने गेले म्हणून मीही त्यांच्या बाजूने राहिलो, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली. जिथे समाधान नाही, तिथे राहायचे नाही, या विधानातील सूचक संकेत लक्षात घेता भुजबळ खरोखरच वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR