25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeसंपादकीयभ्रष्टाचाराने गाठला कळस!

भ्रष्टाचाराने गाठला कळस!

झारखंड व महाराष्ट्र विधानसभा तसेच विविध पोटनिवडणुकांत भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचे दिसून आले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून रोख रक्कम, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू अशा स्वरूपात सुमारे १०८२ कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र व झारखंडमधील जप्ती ही २०१९ सालच्या निवडणुकीत हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या तुलनेत ७ पट अधिक आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत कायदा अंमलबजावणी व पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्र व झारखंडमध्ये एकूण ८५८ कोटींची सामग्री जप्त झाल्याची नोंद आहे. २०१९ च्या निवडणुकीत हाच आकडा महाराष्ट्रात १०३ कोटी तर झारखंडमध्ये १८ कोटी एवढा होता. जप्त झालेल्या मुद्देमालात रोकड, दारू, अमली पदार्थ व मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी आणलेल्या मोफत भेटवस्तूंचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुद्देमाल सापडला, जो गत विधानसभा निवडणुकीपेक्षा खूप अधिक आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका जीपमधून ३.७० कोटी रुपयांची रोकड, बुलडाणा जिल्ह्यातील जामोद येथे ४.५१ कोटी रुपये किमतीच्या गांजाची रोपे जप्त करण्यात आली. रायगडमध्ये ५.२० कोटी रुपयांच्या चांदीच्या छड्या हस्तगत करण्यात आल्या. झारखंडमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर खाणकामांना आळा घालण्यावर जोर दिला होता. यात बेकायदेशीर खाण साहित्य आणि मशिन जप्त करण्यात आल्या. शेजारच्या राज्यातून आणल्या जाणा-या अमली पदार्थांवर पोलिसांची नजर होती. झारखंडच्या डाल्टनगंज जिल्ह्यात ६८७ किलो अफूचे स्ट्रॉ तर हजारीबागमध्ये ४८.१८ किलो गांजा जप्त करण्यात आला. महाराष्ट्रात प्रचारादरम्यान आचारसंहिताभंगाच्या सुमारे ९ हजार तक्रारी दाखल झाल्या तर राज्य व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी रोख रक्कम, अमली पदार्थ, मौल्यवान धातू असा सुमारे ७०० कोटींचा ऐवज जप्त केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

ही आकडेवारी छाती दडपून टाकणारी आहे. निवडणूक काळात भ्रष्टाचाराने कसा कळस गाठला हेही या निमित्ताने उघड झाले आहे. अर्थात ही पकडली गेलेली मालमत्ता आहे. प्रत्यक्षात याच्या कितीतरी पट रक्कम भ्रष्ट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली असावी. त्याचा अंदाज लावणे कठीण आहे. राजकारण्यांकडून होणारे हजारो कोटींचे घोटाळे ही आता काही आश्चर्याची अथवा धक्कादायक गोष्ट राहिलेली नाही. जनतेच्या पैशावर डल्ला मारून लोकप्रतिनिधी म्हणवणारे आपल्या पिढ्यांची तजवीज कशी करून ठेवतात ते आता काही लपून राहिलेले नाही.सारेच लोकप्रतिनिधी तसे असतात असे नाही. काही अपवादही असतात, त्याशिवाय नियम सिद्ध होत नाही. पूर्वी काही राजकारणी आपले घोटाळे दडवण्याचे प्रयत्न करत, आताचे मात्र इतके निर्ढावलेले आहेत की, त्यांच्या मनाला अपराधीपणाची भावना शिवतही नाही. कोणत्या विकासकामात किती टक्के संबंधित लोकप्रतिनिधीला पोहोचवले ते तो ठेकेदारच गावभर सांगत फिरतो! जनतेच्या हितासाठी आपण राजकारणात असल्याचे भासवत हे राजकारणी विकासाच्या नावाखाली स्वत:चा विकास करून घेत असतात.

अर्थात अशी चर्चा होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराने गाठलेला कळस! त्यात भर पडली ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या कर्तृत्वाची. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला विरारमधील ‘हॉटेल विवांता’ मध्ये विनोद तावडे व त्यांचे सहकारी पैसे वाटप करीत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने (बविआ) केला. तावडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपामुळे दिवसभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपमधील अंतर्गत राजकारणात तावडे यांचा ‘गेम’झाल्याची चर्चाही दिवसभर रंगली होती. बविआच्या कार्यकर्त्यांनी सुमारे साडेचार तास आक्रमक पवित्रा घेत हॉटेलमध्ये गोंधळ घातला. त्यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत एका खोलीतून ९ लाखांची रोकड निवडणूक निर्णय अधिका-यांनी जप्त केली. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि अन्य पदाधिका-यांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

तावडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर भाजप करत आहे. पैसे वाटताना विनोद तावडे यांना पकडल्यामुळे भाजपचा ‘नोट जिहाद’ समोर आला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मोदीजी हे पाच कोटी कोणाच्या ‘सेफ’मधून (तिजोरी) आले. सार्वजनिक पैशांची लूट करून तुमचा ‘टेम्पो’ कोणी पाठवला? महाराष्ट्रात मतदानाच्या तोंडावर पैशाच्या बळावर मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे. यात सामान्य कार्यकर्त्यापासून मोठमोठे नेते सहभागी आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली. भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा बिनबुडाचा आरोप करण्यात येत असून, पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच षडयंत्र करून तावडे यांना बदनाम करण्यात येत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले आहे. असो. यंदाच्या निवडणुकीतील भ्रष्टाचार पाहता ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’ झाला आहे यात शंका नाही.

मागच्या विधानसभा निवडणुकीत १२२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेली मालमत्ता पाहता भ्रष्टाचार किती वेगाने वाढतोय ते लक्षात येते. अर्थात याला केवळ राजकारणीच दोषी आहेत असे नाही. शेकडो कोटींची ही रक्कम कुठे जाणार होती ते स्पष्ट आहे. सत्ताधा-यांनी जनतेला लुटायचे आणि जनतेने त्यातील काही तुकड्यांवर समाधान मानायचे असे हे दुष्टचक्र आहे. यालाच ‘यथा राजा तथा प्रजा’ असे म्हणायचे! साधी ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची झाल्यास एखाद्या कोटीची उधळण करावी लागते. त्यामुळे विधानसभेसारख्या निवडणुकीत कोटीच्या कोटी उड्डाणे होणारच! हे सारे भयानक वास्तव आहे. ते बदलण्यासाठी जनतेनेच उठाव करण्याची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR