लातूर : प्रतिनिधी
आगामी होणारी विधानसभा निवडणूक ही आपल्या प्रपंचाची आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे, असे वाटत नाही. सरकारमध्ये केवळ ९ मंत्री भाजपचे आहेत तर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे व अजित पवार यांचेच जास्त मंत्री असून भाजप बाहेरुन पाठिंबा दिल्यासारखे दिसत आहेत्. गेल्या आडीच वर्षात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने सर्व घटकांचा भ्रमनिरास केला. फसवे आश्वासन भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करु, असे सांगणारी भाजप आता राहिली नसून भ्रष्टाचारी लोकाना सत्तेत सामील करुन घेत त्यांचा सन्मान करत त्यांना जवळ केले. लोकांची विश्वासार्हता सत्ताधा-यांनी गमवली आहे. सरकार दिवाळखोर झाल्याची टीका राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी करत या महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभुत करा, असे आवाहन केले.
शुक्रवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भादा सर्कलमधील प्रमुख काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांची संवाद बैठक लातूर येथे घेण्यात आली त्यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नारायणराव लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लातूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक महेंद्र भादेकर, संचालक शेरखॉ पठाण, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, पृथ्वीराज शिरसाट, राजकुमार पाटील, जनार्दन वंगवाड, अॅड. प्रवीण पाटील, सचिन दाताळ, संभाजी सुळ, चांदपाशा इनामदार, रामदास पवार, कॉग्रेसचे मीडिया प्रमुखं हरिराम कुलकर्णी, रघुनाथ शिंदे, बालाजी पांढरे, शिवाजी कांबळे उपस्थित होते.
भादा सर्कलच्या विकासाची माझी गॅरंटी
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, औसा तालुक्यातील २७ गावात आमदार धिरज देशमुख यांनी मागच्या पाच वर्षात विकासाची कामे केलेली आहेत. बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. रस्ते, पुल, शाळा, समाज सभागृह आदींचे काम झालेली असून या भागात माझे स्नेहाचे संबंध गेली ४० वर्षापासून आहेत. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना, जिल्हा बँकेच्या माध्यमातून लोकांना कुठलाही भेदभाव न करता मदत करण्याचे काम परिवाराने केले आहे. पुढेही करणार आहोत, असे सांगून ही विधानसभेची निवडणूक आह.े
ग्रामपंचायत सोसायटी निवडणूकीत थोडेफार मतभेद गावात असतात ते विसरुन जावे. एकमेकांशी संवाद ठेवावा. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार धिरज देशमुख यांना या भादा सर्कलमधून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे, यासाठी आताच कामाला लागावे. या भागातील विकास कामासाठी माझी गॅरंटी राहील, असे सांगून एक मॉडेल मतदार संघ आपण करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा परिषदे माजी सदस्य नारायणराव लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, हभप धनराज महाराज रोंगे, सूर्यकांत पाटील, सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त्त केले.
शेतक-यांनी सरकारवरील नाराजी मतपेटीतून व्यक्त करावी
यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख म्हणाले, मागच्या पाच वर्षाच्या काळात येलोरी, शिंदाळा, वानवडा, भादा, बोरगाव, भेटा या सर्व गावांमध्ये अनेक विकासाची काम केले असून प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याने आज भादा सर्कलमध्ये अनेक गावात विकासाची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगून येणा-या काळात राहिलेल्या विकास कामासाठी गती मिळेल. यासाठी काँग्रेस पक्षाला आशिर्वाद द्यावेत. सत्ताधारी पक्षाचे लोक ज्या पद्धतीने आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, आम्ही मात्र जे काम केली तेच सांगत आहोत. लोकांचे कुठलेच प्रश्न सरकारने सोडवले नाहीत. शेतक-यांना पीक विमा नाही, अनुदान रखडले, नुकसान भरपाई मिळाली नाही, सरकारबद्दल लोकांत नाराजी व्यक्त होत आहे. ती नाराजी आपल्या मतपेटितून व्यक्त करावी. काँग्रेसला जास्तीत जास्त मताधिक्य या भादा सर्कलमधून विधानसभेला द्यावे. विजयाची घौडदौड सुरु ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त्त केली.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम सुरु झाला आहे. ५ वर्षानंतर ही निवडणूक होत असते. कारभारी कोण हवा आहे यासाठी ही निवडणुक जनतेच्या अदालतीमध्ये होणार आहे. जिल्ह्यात लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी ज्या पद्धतीनं सहकार चळवळ टिकवली, वाढवली, विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावले. आज सगळीकडे विकास झालेला दिसत आहेत. त्याचे श्रेय आपल्या काँग्रेस नेत्याकडे जाते. विकासाची घडी विस्कटू नये यासाठी काँग्रेसला साथ द्यावी. हाताच्या पंजाचे बटन दाबुन अधिक मताधिक्य द्या, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी केले.