32.2 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रमंदिर प्रवेशावरून तरुणाला दिले चटके; आव्हाड संतापले

मंदिर प्रवेशावरून तरुणाला दिले चटके; आव्हाड संतापले

जालना : प्रतिनिधी
राज्यामध्ये अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच याचप्रमाणे जालन्यामध्ये केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून एका तरुणाच्या उघड्या अंगावर लोखंडी सळईने गरम चटके दिल्याचा व्हीडीओ समोर आला आहे.

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणावर काही लोकांकडून अमानुष अत्याचार होत असल्याचे दिसत आहे. कैलास बोराडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर येत आहे. तरुणाच्या उघड्या अंगावर हे जळत्या सळईचे चटके दिले जात आहेत. तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर, गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावर चटके देत संशयितांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जालन्याच्या पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून आरोपीला अटक झाली आहे. तसेच आरोपीवर ३०७ चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनांमुळे माणसांमधील माणुसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

कायदा-व्यवस्था वेशीला टांगली : आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी व्हीडीओ शेअर करताना लिहिले आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बो-हाडे या तरुणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR