24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमतदान केंद्रावर नियुक्त्त अधिकारी, कर्मचा-यांनी जबाबदारीने काम करावे 

मतदान केंद्रावर नियुक्त्त अधिकारी, कर्मचा-यांनी जबाबदारीने काम करावे 

लातूर : प्रतिनिधी
लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेला अतिशय महत्व असून ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यामध्ये मतदान केंद्रावर नियुक्त केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची भूमिका महत्वाची असून सर्वांनी पारदर्शक, नि:पक्षपाती काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. दयानंद सभागृह येथे आयोजित मतदान केंद्रावर नियुक्त्त करण्यात आलेल्या लातूर शहर विधानसभा क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमात श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार पंकज मांदाडे, बरुरे, गणेश सरोदे यावेळी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होवून देशासाठी महत्वपूर्ण कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्याला मिळाली असून सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सजग राहून ही जबाबदारी पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक अथवा हयगय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. निवडणुकीत प्रत्येक बाबीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट सूचना निर्गमित केल्या असून आपल्या जबाबदारीशी संबंधित सूचनांचे अवलोकन आणि आकलन करून घेवून प्रत्येकाने काम करावे. एखादी बाब लक्षात न आल्यास संबंधित प्रशिक्षकांना विचारुन त्याचे निराकरण  करुन घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत मतदानादिवशी चूक होवू नये, कोणतीही नोंद राहून जावू नये, तसेच मतदान यंत्र जोडणी, मॉकपोलची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, याची सर्वांनी काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. मॉकपोल, अत्यावश्यक सेवेतील मतदारांचे मतदान, तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचा-यांनी द्यावयाचे विहित नमुन्यातील अहवाल अचूक राहतील याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडून मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी श्रीमती न-हे-विरोळे यांनी दिल्या. तसेच अभिरुप मतदान केंद्र आणि पीपीटीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. याठिकाणी उभारण्यात आलेले प्रारूप मतदान केंद्र, मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधा, मतदार जागृतीसाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट आदी बाबींची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR