24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeधाराशिवमतदान झाले तरी फोन यायलेत राव....

मतदान झाले तरी फोन यायलेत राव….

कळंब : सतीश टोणगे
गतवेळेपेक्षा या लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसला. कारण मतदार असो किंवा नसो त्यांच्या फोनवर मतदानाची विनंती करणारे फोन वाजत होते, आणि आता बहुतांश मतदारसंघांतील मतदान संपले तरी मतदार व संबंध नसतानाही पाचव्या टप्प्यातील उमेदवारास मतदान करण्यासाठी विनंतीचे फोन येऊ लागल्याने या फोनाफोनीला मतदार कंटाळले असून, आश्चर्यही व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, निवडणूक आयोग, उमेदवाराचे समर्थक, विविध पक्षांच्या कार्यालयांतून फोन, तसेच उमेदवार यांनी मतदार असो किंवा नसो फोन करून मतदान करण्याची विनंती केल्याने, त्यांच्या विनंतीला मान देऊन भर उन्हात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व सुटलो बाबा या प्रचाराच्या संकटातून… असे म्हणून सुस्कारा सोडला. पण या फोनने काही पिच्छा सोडला नाही. मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. पाचव्या टप्प्यात मराठवाड्यात मतदान नसतानाही, मुंबईमधील विविध उमेदवार फोन करत आहेत व मतदान करून विकास करण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंती करू लागल्याने मतदार आश्चर्यचकित झाला आहे.

मुंबईतील उमेदवार यामिनी जाधव यांच्या आवाजातील ज्येष्ठ नागरिक नामदेवरावांना फोन आला. ते धाराशिव जिल्ह्यातले ..मतदान पण केले, असे असताना पुन्हा मतदान करण्याचा फोन आल्याने मुंबईला जायचे का, असे त्यांनी नातवाला विचारले,.. नातवाने आजोबाला असे फोन येत असल्याचे सांगितले. त्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. राज्यातील सर्वच नागरिक वापरत असलेल्या फोनची यादी सर्वच पक्षांकडे आहे, आवाज टॅप करून ते सर्वांना पाठवले जाते. यासाठी अनेक एजन्सी काम करू लागल्या आहेत. संपर्कासाठी या फोन नंबरचा उपयोग होऊ लागला आहे. मतदार नसतानाही फोन येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे…..याला तर कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही असे म्हटले जाते. हरिभाऊ म्हणाले मतदान करा म्हणून बक्कळ फोन आले, मतदान झाल्यावर आभाराचा एकही फोन आला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR