31.9 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeसंपादकीयमतदार वाढले कसे?

मतदार वाढले कसे?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळाले आणि सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक ७० लाख मतदार कसे वाढले, असा प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला तसेच शिर्डीमध्ये एकाच इमारतीत ७ हजार नवे मतदार यादीमध्ये समाविष्ट कसे झाले, असाही प्रश्न त्यांनी केला. ४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन अहिरे यांची रीट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. भारतीय संघ, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत. महाराष्ट्रात गत पाच वर्षांत मतदारांची संख्या ३२ लाखांनी वाढली, मग लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यांत मतदारांची संख्या ४८ लाखांनी कशी वाढली असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त काँग्रेसने पुन्हा एकदा मतदारयादीत त्रुटी असल्याची टीका केली आहे. तसेच आघाडीच्या १०० पराभूत उमेदवारांनी या संदर्भात विविध न्यायालयांत याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत सहा वाजल्यानंतर सुमारे ७५ लाख मतदारांनी मतदान केले.

परंतु प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेली मते यात मोठी तफावत असल्याचा दावा करून ही निवडणूक रद्दबातल घोषित करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाच्या दिवशी शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची विशेष करून मतदान संपल्यावर सायंकाळी सहानंतर निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर मिळणा-या टोकनशिवाय मतदान झाल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावर मतांच्या संख्येत तफावत झाल्याचा दावा कोणत्या आधारावर करत आहात अशी विचारणा न्यायालयाने केली. मुख्य निवडणूक अधिका-यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती दिल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. मतदानाच्या शेवटच्या तासात सुमारे ७५ लाखांपेक्षा जास्त मतदान झाले. या मतांची नोंद किंवा सत्यता पडताळण्यासाठी पारदर्शक प्रणाली प्रदान केलेली नाही. ९५ मतदारसंघांमध्ये झालेले मतदान आणि निकालाच्या वेळी मिळालेल्या मतांमध्ये तफावत आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते मतदानाची वेळ संपेपर्यंत सुमारे ६.८० टक्के मतदान केल्याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित निवडणूक अधिका-याने निकाल जाहीर करू नये असा नियम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याचे याचिकेत म्हटले आहे. अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी १७ फेबु्रवारी रोेजी होणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाली, सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानातील घोळ, त्याबाबतची कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाने दिलेला नकार आदी मुद्दे या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिर्डी येथील नवीन मतदारांचा प्रश्न उपस्थित केला. शिर्डीच्या एका इमारतीमध्ये ७ हजार नवमतदार वाढले. याबाबत आपण आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतके मतदार नव्याने समाविष्ट झाले. आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकसभा मतदारयादी, नाव आणि पत्ते मागितले आहेत. नवे मतदार प्रामुख्याने अशा मतदारसंघात वाढले आहेत,

जिथे भाजप पराभूत झाली होती. हा डेटा आमच्याकडे आहे. निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या समितीमार्फत केली जायची पण आता सरन्यायाधीशांना समितीमधून का हटवण्यात आले असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आता पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेता समितीमध्ये आहेत. मोदी आणि शहा बहुमताने निर्णय घेणार आणि विरोधी पक्षनेत्याला त्यांचा निर्णय मान्य करावा लागणार. सरन्यायाधीश सदस्य असते तर समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली असती. त्यामुळे समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते जायचे कशाला हा राहुल गांधी यांना पडलेला प्रश्न रास्तच म्हणावा लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण नव्हते.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर त्यासाठी मध्यस्थी करण्याकरिता अमेरिकेला गेले होते असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. जयशंकर यांनीही ‘एक्स’वरील संदेशात राहुल गांधी यांचा दावा फेटाळून लावला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची ‘मेक इन इंडिया’ संकल्पना चांगली होती असे म्हटले परंतु उत्पादनाच्या बाबतीत ही योजना फेल झाल्याची टीकाही त्यांनी केली. आपण एक देश म्हणून उत्पादन वाढवण्याच्या बाबतीत अपयशी ठरलो आहोत. आपला फोन दाखवत राहुल म्हणाले, हा फोन भारतात बनलेला नाही, केवळ भारतात असेंबल केला आहे. यातील सर्व पार्ट चीनमध्ये बनवले आहेत असे सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला. बेरोजगारीच्या समस्येवरही आपण मार्ग काढू शकलो नाही. देशातील युवकांना रोजगाराविषयी कोणतेही ठोस उत्तर देता आलेले नाही.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला. चव्हाण म्हणाले, गत पाच वर्षांत ३२ लाख मतदारांची संख्या वाढली आहे. पण गत ५ ते ६ महिन्यांत ७६ लाख मतदारसंख्या झाली. म्हणजे सुमारे ५० लाख अतिरिक्त मतदार वाढले. यातील बहुतेक मतदान महायुतीच्या बाजूने झाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीने जिंकली होती. त्यानंतर सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीत ७० लाख नव्या मतदारांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली गेली. इतक्या मोठ्या संख्येने अतिरिक्त मतदार कसे वाढले? गोलमाल है भाई गोलमाल है!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR