22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरमनपाचे १३० हातपंप; ६९ विद्यूत पंप बंद

मनपाचे १३० हातपंप; ६९ विद्यूत पंप बंद

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराला जेव्हा जेव्हा पाणीटंचाई जाणवली तेव्हा तेव्हा शहरातील ‘मिनी वॉटर सप्लाय’ महत्वपूर्ण ठरली. परंतू, यंदा पाणीटंचाईचे सावट घोंगावत असताना लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे या ‘मिनी वॉटर सप्लाय’कडे कमालीचे दूर्लक्ष होत आहे. सद्य:स्थितीत मनपाचे १३० हातपंप तर ६९ विद्यूत पंप बंद अवस्थेत आहेत. ज्या विद्यूत पंपांना आणि हातपंपांना ब-यापैकी पाणी आहे, त्याचे नियोजनही मनपाला अद्यापतरी करता आलेले नाही.
लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात २१.१८६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ११.९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातून दररोजचा पाणी उपसा आणि बाष्पीभवनाने पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे लातूर शहराला महिन्यातून चार वेळेस नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना खाजगी विंधन विहिरींवर अवलंबुन राहावे लागत आहे. पाणीटंचाईच्या काळात नेहमीच लातूरसाठी मदतीला येणारी लातूर शहर महानगरपालिकेची ‘मिनी वॉटर सप्लाय’ यंदाही महत्वपूर्ण ठरणार आहे. परंतू, याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचा वापरही वाढला आहे.
लातूर शहरात महानगरपालिकेचे एकुण विद्यूत पंप १०६२ आहेत. त्यातील ६४ विद्यूत पंप कायमस्वरुपी बंद आहेत. ९४७ विद्यूत पंप चालू आहेत. पाण्याअभावी ६९ विद्यूत पंप बंद पडलेले आहेत. तर ३० विद्यूत पंपांना पाणी अत्यंत कमी आहे. मनपाचे २५४ हातपंप  आहेत. त्यापैकी १३० हातपंत बंद पडलेले आहेत. १२४ हातपंप चालू आहेत. ५० हातपंपांचे पाणी कमी झाले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील ‘मिनी  वॉटर सप्लाय’ म्हणून जी व्यवस्था मनपाने लाखो रुपये खर्च करुन  उभी केली आहे ती सक्षम कशी होईल, याचा विचार करणे आवश्यक आहे.
महानगरपालिकेच्या बहूतांश विंधन विहिरी व विद्यूत पंप शहरातील  झोपडपट्टी, गोरगरीबांच्या वसतीमध्ये आहेत. आठवड्यातून केवळ एक दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा होतो आहे. झोपडपट्टीतील नळांना पाणी येत असले तरी ते पुरेसे मिळत नाही. त्यामुळे त्यांना विद्यूत पंप किंवा विंधन विहिरींवरच अलवलंबुन राहावे लागत आहे. बंद पडलेले १३० हातपंप आणि ६९ विद्यूत पंप दुरुस्त केले तर या गोरगरीब नागरिकांच्या पाण्याची सोय होणार आहे. ज्या विद्यूत पंपांना व विंधन विहिरींना ब-यापैकी पाणी आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन झाले तर भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई कमी करता येणार आहे. याकडे लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR