मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या निर्णायक आंदोलनात नवा वाद निर्माण झाला आहे. मराठा समाजाचे नेते आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची एक बनावट चित्रफीत (व्हिडीओ) समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे.
या ९ सेकंदांच्या चित्रफितीत जरांगे समोसा खात असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही चित्रफीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे मराठा आंदोलकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान अन्नत्याग केलेल्या जरांगे-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हा बनावट व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या चित्रफितीत जरांगे समोसा खात असल्याचे दाखवले असून, ती इतकी वास्तववादी आहे की ती खरी वाटावी. मात्र, ती पूर्णपणे अक तंत्रज्ञानाने बनवल्याचे उघड झाले आहे. ‘‘हा जाणीवपूर्वक कट आहे. जेव्हा योद्धा शरण येत नाही, तेव्हा त्याला बदनाम केले जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया एका आंदोलकाने व्यक्त केली. काही आंदोलकांनी हा व्हिडीओ भाजपच्या आयटी सेलमधून प्रसारित झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांत तक्रार दाखल होणार
या बनावट चित्रफितीमुळे मराठा आंदोलनाला खीळ घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे. अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आंदोलकांनी संयम राखावा, जेणेकरून विरोधकांना कोणताही फायदा होऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्च्याने नागरिकांना केले आहे.