17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमनोज जरांगे फॅक्टर फ्लॉप का ठरला, ५ कारणे!

मनोज जरांगे फॅक्टर फ्लॉप का ठरला, ५ कारणे!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
लोकसभेला सर्वात मोठा फॅक्टर ठरलेल्या मनोज जरांगेंची जादू मात्र विधानसभा निवडणुकीत चालली नाही. उलट विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक जागा या महायुतीने जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर का फ्लॉप ठरला? पाहूया त्याची ५ कारणे…

१. भूमिकेविषयी संभ्रम
विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली होती. मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक मतदारसंघात आपले उमेदवार उतरवतील असेही मानले जात होते. मात्र त्यांनी याबाबत शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. ते वारंवार भूमिका बदलत राहिले, ज्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचे दिसले.

२. स्पष्ट संकेत देण्यात अपयश
मनोज जरांगे पाटील यांच्या टिकेचा रोख महायुतीसह महाविकास आघाडीवरही कायम होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल मतदारांमध्ये संभ्रम राहिला. त्यांनी भलेही ‘सगळ्यांना पाडा, सरसकट पाडा’ असे आदेश दिले होते. मात्र तरीही त्यांनी नेमके कोणाच्या बाजूने राहा किंवा कुणाला पाडा याबाबत आपली थेट भूमिका जाहीर केली नव्हती. यावरुनही मराठा बांधवांची गोंधळाची भूमिका राहीली. त्यामुळेही जरांगे फॅक्टर फेल ठरला.

३. महायुतीची हुशारी
मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या आव्हानानंतरही महायुतीने उमेदवारी देताना दाखवलेली हुशारी महत्वाची ठरली. भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांनी मराठवाड्यात बहुतांश उमेदवार हे मराठा असतील याची काळजी घेतली. मराठा उमेदवार समोर असल्याने कोणती भूमिका घेणार? असा प्रश्न मराठा बांधवांसमोर होता. तसेच लाडकी बहीणचाही महायुतीने जोरदार प्रचार केला. स्थानिक मुद्दे हेरुन त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे काम केले. ज्याचा मोठा फायदा महायुतीला झाला.

४. मराठा-ओबीसी मतांचे ध्रुवीकरण
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर त्याला ओबीसी बांधवांचाही प्रतिसाद, मिळाला. मात्र त्यानंतर त्यांनी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली त्यामुळे ओबीसी-मराठा वाद सुरु झाला. जरांगेंच्या या ओबीसी विरुद्ध भूमिकेमुळे नवा संघर्ष उभा राहिला. एकीकडे लक्ष्मण हाके आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील असा सामना रंगला. त्यामुळेच ओबीसी मतांचा कल महायुतीकडे वळला आणि एकगठ्ठा युतीला मतदान झाले. ज्याचा फटका मविआला बसला.

५. फडणवीसांवर अश्लाघ्य टीका
मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यापासून सत्ताधा-यांवर निशाणा साधत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा रोख धरला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी टिका मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरच केली, त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे विरोधकांना मदत करत आहेत असा संदेश गेला. फडणवीस यांच्यावर सतत अश्लाघ्य करणे हे मराठा समाज बांधवांसह राज्यातील जनतेला आवडले नव्हते. तसेच त्यांची ओबीसींमधून आरक्षणाची मागणी असल्याने ओबीसी बांधव एकवटले. दुसरीकडे विरोधकांनीही सरकारविरोधात केलेला प्रचार त्यांच्यावरच उलटला आणि महायुतीला अप्रत्यक्षरित्या बळ मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR