अहमदपूर : प्रतिनिधी
मराठवाडा हा तहानलेला आहे. पश्चिमेकडील पावसाचे पडणारे पाणी पूर्वेला आणायचे आहे. पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जाऊ न देता ते वळवायचे आहे. शेतक-यांच्या सिंंचनाचा प्रश्न सोडविणार असून राज्याच्या विकासासाठी केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आहे, असे प्रतिपादन अहमदपूर येथील शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते तर मंचावर कॅबिनेटमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, सुरज चव्हाण, डॉ. अफसर शेख आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.
ना. पवार म्हणाले की, स्त्री हे शक्तीचे प्रतीक आहे. महिला खूप हुशार आहेत पण आर्थिक बाबतीत सक्षम नाहीत. आता भाऊबीजेला दिपवाळीची ओवाळणी आम्ही दिलेली आहे. आता महिलांच्या चेह-यावर हसू आले आहे. राज्यातील दोन कोटी तीस लाख महिलांना पंधरा हजार कोटी रुपये दिले आहेत. वर्षाला तीन गॅस सिलेंडर , गरिबांना मोफत शिक्षण या योजना चालू ठेवण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करीत हा दादाचा वादा असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, रेल्वे, विमानतळाची सुविधा करणे गरजेचे आहे. केंद्राने पालघरला बंदर मंजूर केले, दहा मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केले आहे ,वंदे भारत ट्रेन, धरणे ही कामे सध्या जोमाने होत आहेत. १५ लाख शेतक-यांचे विद्युत बिल भरले असून तीन आणि पाच एचपीच्या मोटारीचे आता शून्य बिल येणार असल्याचे सांगून आम्ही सर्व गुणवत्तापूर्ण कामे करत आहोत. अंतेश्वर उच्च प्रकल्पाला सहकार्य करणार, तरुणांना शक्षिणासाठी मदत देत आहोत ,आम्हाला समाजाचे भले आणि सर्वांगीण विकास करावयाचा आहे. हे शेतक-यांचे सरकार असल्याचे सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्राचे त्यांनी आभार मानले.
यावेळी सामाजिक बांधिलकी जपणारे, विश्वासाचे,व देशाचा गौरव वाढविणारे उद्योजक रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून हार तुरे न घेता अगदी साधेपणाने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचकराव पाटील, अविनाशराव जाधव, सुरज पाटील, शिवाजी खांडेकर ,रहीम पठाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले तर आभार शिवानंद हेंगणे यांनी मांडले.