वीज पडून ३ ठार, बैल, गाय, वासरू दगावले
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वा-यासह गारपीट आणि पाऊस झाल्याने फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. विशेषत: आंबे आणि द्राक्षबागांची मोठी हानी झाली. दरम्यान, अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
मराठवाड्याच्या काही भागाला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले. दुपारनंतर वादळासह गारपीट आणि पाऊस झाला. पावसामुळे भाजीपाला, फळबागा आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोडापूर (ता. गंगापूर) येथे शेतवस्तीवरील अशोक नंदू म्हस्के (२२) या तरुण शेतक-याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मगरवाडी (ता. अंबाजोगाई) येथील सचिन मधुकरराव मगर (३५) यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला. ढोरवाडी (ता. वडवणी) येथील अभिमन्यू पांडुरंग नलभे (३६) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील परतूर येथील शेख मुख्तार शेख अख्तर कुरेशी यांचा बैल दगावला असल्याचे तहसील कार्यालयाने सांगितले. परभणी जिल्ह्यातील कोरवाडी (ता. जिंतूर) येथील समाधान सुदाम कोंडाळ यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडून गाय आणि वासराचा होरपळून मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, पैठण, वैजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्यातील बदनापूर, रोहिलागड परिसरातही मोठा पाऊस झाला.
लातूर, बीडमध्ये अवकाळी
लातूर शहरासह जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. लातूर शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. रेणापूर शहरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. बीड जिल्ह्यातही केज तालुक्यात चिंचोली माळी, हदगाव, डोका, सारुकवाडी परिसरात गारांसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिके, फळझाडांचे मोठे नुकसान झाले.