मांजरासह नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, शेतीपिकांची प्रचंड हानी
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात लातूर, धाराशिव, बीडसह जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाच्या धारा सुरूच असून, रोजच दमदार पाऊस कोसळत असल्याने शेतपिकांची हानी झाली असून, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. ब-याच ठिकाणी पावसाळ््या अगोदरच नद्या दुथडी भरून वाहू लागल्य असून, लातूर जिल्ह्यात मांजरा, रेणा, तेरणा, घरणी नद्या दुथड्या भरून वाहात आहेत. ओढे, नालेही तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
लातूर जिल्ह्यातही गेल्या १० दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. रोजच पहाटे, सकाळी दुपारनंतर पावसाच्या धारा जोरात सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळीही जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या धारा सुरूच होत्या. मुसळधार पावसामुळे पावसाळ््यापूर्वीच नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. मांजरा, रेणासह इतर नदी पात्रांतील बॅरेजेस तुडुंब भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मांजरासह रेणा, तेरणा, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. इतर नद्यांनाही पुराचा धोका असल्याने आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात अवकाळीचा धडाका सुरूच असून, आष्टी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. तसेच जिल्ह्यात इतर भागांतही पाऊस कोसळत असल्याने मान्सूनपूर्व काळातच नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. शेतक-यांचे काढणीला आलेले कांदा, भूईमूग, मका, कडब्याच्या गंजी व इतर फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान झाले.
यासोबतच नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यातही ब-याच भागात ढग दाटून आले. काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने शेतीकामे खोळंबल्याने शेतकरी धास्तावला आहे. कारण यंदा मान्सून लवकर धडकणार आहे. तत्पूर्वी शेतीकामे मार्गी लागली पाहिजेत. परंतु सध्या तुफान पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यात ब-याच ठिकाणी हजेरी
राज्यातही विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही कुठे ना कुठे रोज पावसाचा धडाका सुरू आहे. आज पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे फळझाडांची हानी झाली. कोल्हापूर, सांगली, साता-यातही पावसाचा जोर कायम असून, कृष्णा, कोयनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच कोल्हापुरात पंचगंगा दुथडी भरून वाहात असून, राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. पुणे, मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. दुसरीकडे विदर्भात नागपूर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात आजही पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात तर १३ दिवसांपासून पाऊस सुरू आहे.
कोकणात मुसळधार!
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोव्याजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत असल्याने शुक्रवारपासून तीन दिवस मुंबईसह कोकणापर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनची उद्या
केरळात धडक!
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेआधीच रविवारी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे येत्या २५ मेपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकते. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी मान्सूनची केरळमध्ये एन्ट्री झाली होती.