बीड : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेण्याची घोषणा केली होती. फक्त एका जातीच्या बळावर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आता मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणा-यांना निवडणुकीत पाडावे, असा आदेश जरांगे पाटील यांनी दिला होता. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून बीड जिल्ह्यातून दौ-याला सुरुवात केली आहे. गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या दौ-याला सुरुवात झाली.
विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाहीत. त्यांना खडे बोल सुनावत त्यांनीच पचका करून ठेवला असल्याचे पाटील यांनी म्हटले. मी ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते. अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही.
मला समाजाचे भविष्य बघायचे आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते. मात्र, त्यांच्यासाठी सहा कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी मूर्खासारखे चाळे नाही करू शकत, मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणवले गेले असते, टोमणे मिळाले असते, त्यामुळे माझी, समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.