मुंबई : प्रतिनिधी
भैय्याजी जोशी यांच्या मुंबईतील मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी या वक्तव्याचा कडाडून निषेध केला आहे. विरोधकांनीही या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावे! असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच भडकले आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी त्यांच्या या विधानावर कडाडून टीका केली. भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. जोशी यांच्या विधानाने वादाची ठिणगी पेटली आहे.
, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही भूमिका घेणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख, राज ठाकरे यांनीही भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. फेसबुक या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरील अधिकृत अकाऊंटवर राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत भैय्याजी जोशींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण करताना आपण स्वत: मराठी आहोत याचे भान पण जोशींनी सोडावे? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावे! असा इशाराही त्यांनी दिला.
देशाची झालेली भाषावार प्रांतरचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेले बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असे अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचे कारण काय? भय्याजी जोशींनी असेच विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावे. आणि भैय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असे विधान जर इतर राज्यात केले असते तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? हे काय चाललेय हे न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावे! हे राजकारण करताना आपण स्वत: मराठी आहोत याचे भान पण जोशींनी सोडावे? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.