26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी मालिकांतून महायुतीचा छुपा प्रचार

मराठी मालिकांतून महायुतीचा छुपा प्रचार

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेत्यांच्या प्रचारसभांनी वातावरण तापू लागले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पक्षांच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. महायुतीकडून मालिकांमध्ये सुद्धा जाहिरातींची घुसखोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, मोठ्या राजकीय नेत्यांच्या सभा सुरू असतानाच आता बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतले स्टार प्रचार करताना दिसतायत.

सा-याच उमेदवारांनी पारंपरिक प्रचाराला बगल देत हायटेक प्रचाराला जवळ केले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी त्यांच्या ट्विटरवर काही व्हीडीओ शेअर केले आहेत. या जाहिराती स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये पाहायला मिळत आहेत. हे व्हीडीओ शेअर करत सावंत यांनी लिहिले, ‘महायुतीने छुप्या जाहिराती करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे.

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी प्रक्षेपित आणि १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता व ४ वाजता पुन: प्रक्षेपित भागात खुलेआम महायुतीच्या (शिंदे सेनेच्या) जाहिरातीचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. त्याच पध्दतीने ‘प्रेमाची गोष्ट’ व इतरही मालिकांमध्ये ही जाहिरात चित्रांकित करण्यात आली आहे.

पुढे त्यांनी लिहिले, ‘एका सीनवरून दुस-या सीनवर जाताना ही जाहिरात दाखवली जात आहे. निवडणूक आयोगापासून हे लपवून केले जात आहे. विशेष म्हणजे डिस्ने हॉट स्टारवर या मालिकेचे भाग दिसतात. पण कुठेही रेकॉर्ड राहू नये म्हणून तिथे जाहिरातींचा भाग दडवण्यात आला आहे. संविधान, लोकशाही, निवडणूक आयोग यांची तमा तर यांना नाहीच पण नैतिक पातळीवरही यांचे अध:पतन झाले आहे. अशा किती कुटील क्लृप्त्या यांनी वापरल्या आहेत हे निवडणूक आयोगाने शोधून काढले पाहिजे. सदर प्रकाराचा जाहीर निषेध करतो तसेच कारवाईची मागणी करतो. इतर वाहिन्यांवर असाच प्रकार घडला असल्याची दाट शक्यता आहे. मी स्वत: पेनड्राईव्हसहित पुरावा घेऊन आज १२ वाजता मुख्य निवडणूक अधिका-यांना भेटणार आहे व तक्रार दाखल करणार आहे.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR