लातूर : प्रतिनिधी
मराठी साहित्याचं विश्व ख-या अर्थाने ग्रामीण व दलित साहित्याने रुंदावले आहे. त्याची प्रचिती लेखक, कथाकार सतीश सुरवसे यांच्या ‘शिरखिळा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना प्रख्यात साहित्यिक, लेखक प्रा. शेषराव मोहिते यांनी प्रतिपादन केले. दिवाळी पाडव्याच्या दिवशी १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जयक्रांती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रा. शेषराव मोहिते बोलत होते. यावेळी मुंबई येथील चित्रकार प्रा. मोग्लान श्रावस्ती, सोलापूर येथील प्रा. हनुमंत मते, प्रभाकर प्रकाशनचे प्रकाशक वीरभद्र गुळवे, प्रा. दुष्यन्त कटारे, प्रा. माधव गादेकर, चित्रकार प्रा. प्रकाश घादगीने, प्रकाश वाघमारे, जी. जी. कांबळे, प्रा. सामुग्राव, दिलीप गायकवाड, एन. टी. कांबळे, प्रकाश सुरवसे, शशिकला सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. शेषराव मोहिते पुढे म्हणाले, प्रस्थापीत लेखकांच्या साहित्याला नामदेव ढसाळ, राजा ढाले, दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, रा. रं. बोराडे यांनी हादरे दिले. त्यांच्या साहित्याने मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. सतीश सुरवसे यांच्या लेखनात खरेपणा आहे. साधेपणा आहे. साधेपणा जपणं, जगणं सोपं नाही. ‘शिरखिळा’ या पुस्तकातील कथा, किस्से, घटना या त्यांनी जे अनुभवलं, भोगलं, पाहिलं त्याची अस्सल ग्रामीण लोकभाषेतील प्रचिती आहे. प्रारंभी मान्यवंरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सतीश सुरवसे लिखित ‘शिरखिळा’ पुस्तकाचे प्रकाशन प्रा. शेषराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रा. मोगलान प्रा. मोगलान श्रावस्ती यांनी सतीश सुरवसे यांच्या ‘शिरखिळा’ पुस्तकावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
पुस्तकातील लक्षनिय काही कथेचा संदर्भ देऊन या कशा प्रेरणादायी व आदर्श आहेत. हे सांगून सतीश सुरवसे यांच्या लेखनात ग्रामीण भाषेचा बाज आहे. त्यांच्या कथा वाचल्यानंतर बुद्धाची करुणा, समतेची आठवण होते. समाजात आजही भेदभाव आहे, याची जाणीव करून देते. पंतप्रधानाच्या गावात ही भाड्याने खोली मिळत नाही, हे वास्तव आहे. करुणा, मैत्री, प्रेम हे जीवनमूल्य अंगीकारणे, माणूस बनने आज काळाची गरज आहे, असे प्रा. श्रावस्ती यांनी सांगितले. यावेळी डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी सतीश सुरवसे यांच्या लेखनाचे कौतूक करणारा संदेश पाठवला तर प्रा. हनुमंत मते यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक, साहित्ययिक सतीश सुरवसे यांनी आपल्या मनोगतात ‘शिरखिळा’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील कहाणी सांगितली. सूत्रसंचालन, प्रास्ताविक प्रा. हनुमंत मते यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सौ. स्वाती जावळीकर यांनी मानले.
















