मुंबई : धारावीतील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेकडून मशिदीच्या बेकायदा बांधकामावर कारवाईवेळी धारावीतील मुस्लिम समाजाने आंदोलन केले. महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी पथक दाखल झाले होते.
पण धारावीतील तोड कारवाई स्थगित करण्यात आली आहे. मुंबई पालिकेकडून या बांधकामासंदर्भात ६ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धारावी येथे अनधिकृत मस्जिद बांधायची, वाढवायची आणि लँड जिहाद करायचे. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सरकारी कर्मचारी आले तर मुस्लिम समाजाला भडकवून हल्ले, दंगे माजवण्याचे कारस्थान उद्धव ठाकरे सेना व काँग्रेसचे नेते करत आहेत.
ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत भेंडी बाजारात भाषण करतात. मशिदींची एफ. एस. आय. डबल करू म्हणतात. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारावी अनधिकृत मस्जिद, लँड जिहादविरोधात कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली असल्याचेही सोमय्यांनी म्हटले.
राज्यात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न : जलील
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी धारावी प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मशीद अनधिकृत जागी बांधता येत नाही. मला विश्वास आहे की ही मशिदीची कागदपत्रं आहेत. राज्यात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. कुठेतरी याला गृहमंत्री जबाबदार आहेत.