मुंबई : प्रतिनिधी
‘बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यांपासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरून माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही, असे सिध्द होते.’ अशी खदखद व्यक्त करत पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील महाराज यांनी राजीनामा देणे हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या.
सुनील महाराजांनी पत्रात नेमकं काय लिहिले…..
मात्र, भेटीसाठी वेळ मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी अखेर पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात लिहिलं की, उद्धव ठाकरे साहेब, सस्रेह जय महाराष्ट्र! आपण शिवसेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रीय स्तरावर आघाडीचे प्रमुख नेते म्हणून कार्य करत आहात.
त्याबद्दल सर्वप्रथम महंत या नात्याने आशीर्वाद सोबतच एक शिवसैनिक म्हणून हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा. आपण कोरोना काळातील अतिसंवेदनशील परिस्थितीत केलेली उल्लेखनीय कामगिरीची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. ही बाब सर्व भारतीय आणि खास करुन महाराष्ट्रातील जनतेसाठी गौरवाची आहे.
दहा मिनिटं भेटीसाठी वेळ दिली जात नाही
त्याच बरोबर आपण शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले प्रेम आणि न्याय नात्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेने आपल्याला कुटुंब प्रमुखाची उपमा दिली. शिवसेना पक्ष बळकट व्हावा म्हणून मी महंत या नात्याने आपणास आशीवार्द सोबतच पक्षाला माझ्या परिने मदत व्हावी म्हणून माझी प्रामाणिक जबाबदारी जाणून मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता.
शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढीसाठी संघटन स्तरावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या एक वर्षापासून संघटन स्तरावर काम करण्यासाठी आपल्याकडून आदेश आणि सुचनांची वाट पाहत आहे. आपण ९ जुलै २०२३ ला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे दर्शनाकरीता आला होता व फेब्रुवारी २०२४ ला जनसंवाद यात्रेनिमित्त कारंजा व वाशिम येथे आला.
या दोन भेटी सोडून आतापर्यंत आपली दहा मिनिटांची भेट घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु आपल्याकडुन दहा मिनिट भेटीसाठी वेळ दिली जात नाही. त्याबद्दल थोडं शल्य वाटतं आहे. आपल्या व्यस्त कार्यामुळे आपण वेळ देणे शक्य होत नसेल हे सुध्दा मला मान्य आहेत.