सोलापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी दोन लाखाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका रक्त तपासणी करणाऱ्या लॅबच्या मालकाने तक्रार दाखल केली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेतील रुग्णांचे रक्त तपासल्याचा अहवाल देण्यासाठी जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी दोन लाखाची लाच मागितली. यासाठी डॉ माधव जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील दोन हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावले. पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी एक लाखावर तडजोड झाली. दरम्यान डॉक्टर जोशी व तक्रारदार यांच्यातील चर्चेचे एका माहिती कार्यकर्त्यांने स्टिंग ऑपरेशन केले व याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशन मधील रेकॉर्डिंगची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी डॉक्टर जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे.