लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील बेघर नागरिकांसाठी बेघर निवारा सुरु करण्यात आला आहे. सदर निवा-याची पाहणी महानगरपालिका आयुक्त देविदास जाधव यांनी केली आणि तेथे असलेल्या बेघर लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हा निवारा शहरातील बेघर लोकांसाठी लाभदायक होणार आहे. या ठिकाणी त्यांचेसाठी सर्व सुविधा देण्यात येणार असल्याचे तसेच या ठिकाणी पुरुष कक्ष, महिला कक्ष व अपंग कक्ष अशी वेगवेगळी राहण्याची सोय केली आहे याची त्यांनी पाहणी केली.
सदर निवारा महानगरपालिका उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरु करण्यात आला आहे. सदर निवारा शहरातील बेघर लोकांसाठी जसे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, फुटपाथ, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, कारखाना व कंपनी परिसर, रस्त्याच्या कडेला, पुलाखाली, बांधकाम साईट, मंदिर, मस्जिद अशा ठिकाणी आश्रय घेणारे वृद्ध, अपंग, भिकारी, बालके, महिला, आजारी व्यक्ती, निराश्रित व्यक्ती, बेवारस आणि ज्यांना पूर्णत: उघड्यावर आश्रय घ्यावा लागतो, अशा लोकांसाठी बेघर निवारा महानगरपालिका शाळा क्रमांक ४, ठाकरे चौक येथे सुरु करण्यात आलेला आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या कार्यालय परिसर, गल्लीमधील परिसरात अशी बेघर नागरिक दिसून आल्यास त्यांना नागरी बेघर निवारा ठाकरे चौक, मनपा शाळा क्र. ४ झोन कार्यालयाशेजारी विवेकानंद हॉस्पिटलच्या पाठीमागे किंवा ९०२८५९१७४५, ९०२८५९१७४५, ९८५०२०३२११ या मोबाईल नंबर वर संपर्क करावे जेणेकरून अशा बेघर नागरिकांना सुरक्षितपणे नागरी बेघर निवारा येथे आश्रय घेता येईल. असे आवाहन आयुक्त देविदास जाधव यांनी केले आहे.