मुंबई : प्रतिनिधी
राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत रहायला आवडते आणि चर्चेत रहायचे असेल तर शरद पवारांचे नाव घ्यावे लाग्ते. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचे अस्तित्व संपलं आहे. शरद पवार यांनी काय करावं त्यापेक्षा राज ठाकरे यांनी काय करावे? किती वेळा त्यांनी भूमिका बदलावी? याचा त्यांनीच विचार करावा. शरद पवार यांना उपदेश करायला जाऊ नये. तुमच्या घराखालीच दलित विद्यार्थ्यांना मारहाण का झाली? एका मुलीला मारहाण झाली, असे सांगतानाच जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असता तेव्हा तुम्ही तुमचा बंगला सोडून लोणावळ्याला जाऊन का राहतात? हे कोणाला माहित नाही. हे जगाला सांगावे लागेल, असा सवालच शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. तुमच्या मनातील जातीद्वेष आणि धर्म द्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना माहीत आहे. राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणात बोलू नये. ज्यांनी परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतली, अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावे? आणि ते पण शरद पवार यांच्याबद्दल बोलावे हे हास्यास्पद आहे आणि त्यांना हास्य विनोद करण्याची सवय आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. मला आताच कळलं, राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. आरक्षण कशासाठी आहे हे समजून घ्यावे लागते. एसीच्या वातावरणातील घरात जन्मलेल्यांना आरक्षणाचे महत्त्व काय कळणार? असा सवाल करतानाच आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. याचा अनुभव असावा लागतो. ज्यांचे चारही हात तुपात आहे आणि डोके कढईत त्यांना काय आरक्षण कळणार? असा सवाल आव्हाड यांनी केला.
त्या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे
जातीनुसार जनगणना होऊन जाऊ दे. बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला कळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती आज काय आहे हे कळेल. आर्थिक दुर्बल असणा-या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.