24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातही ‘पुष्पा २’

महाराष्ट्रातही ‘पुष्पा २’

विजय वडेट्टीवारांचा मिश्किल टोला

मुंबई : प्रतिनिधी
उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका करत या भेटीविषयी भाष्य केले आहे. देशातील सरकार आणि महाराष्ट्रातील ‘पुष्पा २’ ची ही भेट आहे. महाराष्ट्राचा पुष्पा २ कोण हे सांगायची गरज नाही, असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, राज्यात महायुती सरकारची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाच्या कारभाराची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप आणि गौतम अदानी यांच्या कनेक्शनवरून टीकेची झोड उठवली होती. विशेषत: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कथित साटेलोटे असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय, अनेक मुद्यांवरून भाजप आणि गौतम अदानी यांना लक्ष्य केले होते. दरम्यान मंगळवारी झालेल्या भेटीवरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

विरोधी पक्षनेतेपदाबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाजप तयार आहे का? त्यांची तयारी आहे का? हे प्रथम त्यांना विचारू आणि मग पक्षनेतेपदासाठी आम्ही नाव देऊ असेही ते म्हणाले. आम्ही पहिलेच नाव देणार नाही, मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते द्यायला तयार असतील तर मग आम्ही नाव देऊ.

शिंदे, अजित पवारांना दिल्लीला जावे लागते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावे लागेल, त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता हलणार नाही, वारंवार दयेचा अर्ज करून त्यांना ते मिळवावे लागेल,अशी बोचरी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

बॅलेट पेपर हा अंतिम निर्णय
एकमेव आपला देश आहे ज्यात ईव्हीएमवर निवडणुका होतात. सगळे देश ईव्हीएमवर निवडणूक घेत नाहीत. जगाने ज्या गोष्टी नाकारल्या त्या आपण का करतोय, पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, बॅलेट पेपर हा अंतिम निर्णय आहे. त्यासाठी कोर्टात आम्ही दाद मागण्याची तयारी करतोय असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR