पुणे : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरणा-या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे विविध बैठका पार पडल्या. यानंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबतची भूमिका स्पष्ट केली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यावेळी लाडकी बहीण ही योजना आणली त्यावेळी अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या महिलांनाच या योजनेचा लाभ द्यायचा होता. परंतु या सगळ्या गोष्टी तपासण्यात आम्हाला वेळ कमी होता.
आतापर्यंत ज्या कोणालाही पैसे देण्यात आलेले आहेत त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. पण आता ज्या महिलांकडे चार चाकी वाहन असतील, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असतील अशा महिलांना एकच योजनेचा लाभ भेटणार आहे आणि हे आधार कार्डशी लिंक करण्यात येत असून पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे.
शिवभोजन थाळी बंद करणार असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अजून अर्थसंकल्प मांडला नाही. तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती होत आहे. कपोलकल्पित बातम्या आहेत. असा काही निर्णय झालेला नाही, असे यावेळी अजित पवार म्हणाले
राज ठाकरे यांच्यावर टीका
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो असे म्हणत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
सोलापूरकर यांनी असे विधान करायला नको होते
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल असे विधान करायला नको होते. पोलिस त्याची तपासणी करून कारवाई करतील असे, यावेळी अजित पवार म्हणाले.