महिला व बालविकास मंत्री तटकरेंची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. ८ मार्च रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयÞोगाच्या संपल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना जागतिक महिला दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश ६ मार्च २०२५ रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर निर्णयाचे स्वागत होत आहे. राज्य महिला आयोगाने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी याबाबत कार्यवाही करण्यासंबंधी ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे कळविले होते. तसेच केंद्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या अपर सचिवांनीही देशातील सर्व राज्यातील ग्रामविकास सचिवांना २१ फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे महिला सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.
या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी राहावी, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणे गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि नागरिकांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले.
महिला सुरक्षेसाठी
जनजागृतीचा प्रयत्न
महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही विधवा महिलांना रुढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी, गावात बालविवाह होऊ न देणे, गावात मुलींचा जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न करणे आदी ठराव घ्यावेत, अशी यामागे आयोगाची संकल्पना आहे.