35.2 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeसंपादकीयमहिला दिन नव्हे ‘महिला दीन’!

महिला दिन नव्हे ‘महिला दीन’!

८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो, केला गेला. भारतातही या दिवसाची विशेष क्रेझ आहे. आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवलेल्या स्त्रियांचा महिलादिनी विविध कार्यक्रमांतून, वृत्तवाहिन्यांतून, वृत्तपत्रांतून गौरव केला जातो. हे सारे पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की, स्त्री ही केवळ एक दिवस गौरवण्याची बाब आहे का? प्राचीन हिंदू संस्कृतीचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की, येथे स्त्रीला नेहमीच सर्वोेच्च स्थान दिले गेले आहे. हिंदू धर्मशास्त्राने स्त्रीला शक्तीरुप मानले आहे. कोणतेही कार्य असो वा संकल्प त्यासाठी शक्ती अनिवार्य आहे. शक्तीविना कोणताही जीव अथवा वस्तू निर्जीव स्वरूप असते. शक्तीचा सन्मान करणारी देशात शक्तीपीठे आहेत. त्यातील साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत. सज्जनांच्या रक्षणार्थ आणि दुष्टांच्या संहारार्थ शक्तीने वेळोवेळी आपले मारक रुप प्रकट करून आसुरी शक्तीचा विनाश केल्याचे धार्मिक कथांतून, भाविकांतून दिसून येते. ज्या दुष्ट शक्तीपुढे देवताही हतबल झाल्या त्याचा नाश देवींनी आपल्या अगाध सामर्थ्याने केला.

रामायण घडले ते सीताहरणामुळे, महाभारत घडले ते द्रौपदीच्या अपमानामुळे. स्त्रीचा सन्मान करण्याची आणि तिच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावण्याची शिकवण भारतीय संस्कृती आपल्याला देते. वीरमाता जीजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणीच शौर्याचे, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडू पाजले नसते तर कदाचित या देशाला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय लाभले नसते. इतका गौरवशाली इतिहास देशाला लाभूनसुद्धा आज देशात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. गत काही वर्षात स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग, अपहरण, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये आजही दिवसागणिक वाढ होत चालली आहे. आज एकटी स्त्री स्वतंत्रपणे घराबाहेर पडली तर ती सुरक्षित घरी परतेल की नाही याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. एकेकाळी माता-भगिनीच्या रुपात असलेली महिला आज उपभोग्य वस्तू म्हणून पाहिली जात आहे. यातून विदेशी पर्यटक महिलाही सुटलेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वीच कर्नाटकातील हम्पी या पर्यटन स्थळावर एका इस्रायली महिला पर्यटकासह घरगुती निवासाची चालक असलेल्या स्थानिक महिलेवर तिघांनी बलात्कार केला. त्यांच्या बरोबर असणा-या तीन पुरुष पर्यटकांना मारहाण करून त्यांना कालव्यात ढकलण्यात आले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

या घटनेवरून आपल्या समाजाची उत्क्रांती होत आहे की अधोगती? असा प्रश्न पडतो. स्त्री-पुरुष हा समाजउन्नतीचा पाया काही गुंडांमुळे मुलींवरील हिंसक बलात्कारी घटनेने ढासळत असेल तर ती वेळ दूर नाही की ज्यामुळे मुली जन्माला घालणे मुळातच पापकर्म मानले जाईल. महिला दिनानिमित्त जागोजागी महिलांचे सत्कार व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी सरकारने महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे कठोर नजरेने पाहिले पाहिजे अन्यथा वर्षातून एकदा साजरा केला जाणारा ‘महिला दिन’ उर्वरित ३६४ दिवशी ‘महिला दीन’ म्हणून साजरा करावा लागेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया खात्याची धुरा महिलांच्या हाती देण्यात आली होती. यात क्रीडा, विज्ञान, उद्योग, सामाजिक कार्य यासह विविध क्षेत्रांतील नामवंत महिलांचा समावेश होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांच्या हाती देण्यात आली होती. नवसारी जिल्ह्यातील बोरसी गावात आयोजित लखपती दीदी कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आयपीएस अधिका-यांपासून पोलिस शिपायांपर्यंत सर्व सुरक्षा कर्मचारी महिला होत्या. यात २१०० हून अधिक कॉन्स्टेबल, १८७ पोलिस उपनिरीक्षक, ६१ पोलिस निरीक्षक, १६ पोलिस उपाधीक्षक, ५ पोलिस अधीक्षक, १ पोलिस महानिरीक्षक आणि एका अतिरिक्त पोलिस महानिरीक्षकाचा समावेश होता.

महिलांच्या सुरक्षेला आपल्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवताना दिसत आहेत. पूर्वी चूल आणि मूल ही महिलांची ओळख होती ती आता पुसली गेली आहे. असे असले तर आज महिलांविषयक गुन्ह्यांचा आलेख पाहता तो नेहमीच चढत राहिला आहे. दिवसागणिक समाजाचे होत चाललेले नैतिक अध:पतन ही चिंतेची बाब बनली आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करावी लागेल नाही तर महिलांना समाजात वावरणेही कठीण होऊन जाईल. त्यासाठी सर्वप्रथम अश्लील संकेतस्थळांच्या प्रसारणावर पूर्णत: बंदी घालावी लागेल. मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये अश्लील आणि कामुक दृष्ये दाखवण्यावर प्रतिबंध घालावा लागेल. बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींना अश्लील मालिकांतून, दृष्यातून प्रेरणा मिळत असल्याचे एका निरीक्षणाद्वारे आढळून आले आहे.

शाळा, महाविद्यालयांतून नैतिक मूल्यांचे शिक्षण अनिवार्य करावे लागेल. रणरागिणी झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, पुणश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या शूर आणि कर्तृत्ववान योध्द्यांची चरित्रे शिकवावी लागतील. मुलींना शाळा-महाविद्यालयांतून स्व-संरक्षणार्थ ज्युडो-कराटे, लाठी-काठीचे प्रशिक्षण अनिवार्य करावे लागेल. रेल्वे सुरक्षा दलामध्ये (आरपीएफ) कार्यरत महिला कर्मचा-यांना स्वसंरक्षणार्थ मिर्ची-स्प्रे देण्यात येणार आहे म्हणे. महिलांना आपत्कालिन परिस्थितीत या स्प्रेचा वापर करता येऊ शकेल. महिलांनीही आपल्या मर्यादा पाळणे गरजेचे आहे. महिला म्हणजे आदिशक्ती, महिला म्हणजे ऊर्जा, महिला म्हणजे निर्मिती, महिला म्हणजे भविष्याची वाटचाल. तेव्हा भविष्यात देशात महिलाप्रधान संस्कृती अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR