बीड : प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील वकील महिला मारहाण प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणा-या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावाचा सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत मारहाण प्रकरणी सरपंचासह दहा जणांवर युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांच्यासह सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास युसुफ वडगाव पोलिस करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलिस करत आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊड स्पीकर लावू नयेत व घरापुढे पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच ज्ञानेश्वरी अंजान हिच्या आईची कोर्टात सुरू असलेली ३०७ ची केस काढून घेण्यामुळेही वाद होत होते. अशातच १४ एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी अंजान हिला मारहाण करण्यात आली होती. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पाईपने ज्ञानेश्वरीला प्रचंड मारले. ही मारहाण इतकी भीषण होती की, ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंगातील रक्त साकळले असून त्यांच्या पाठीवर काळे-निळे वळ उठले होते.
बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही- तृप्ती देसाई
बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही, ना तिथले लोक पोलिसांना घाबरतात, मग नेमकं बीडमध्ये काय केलं पाहिजे? महिला वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या आरोपींना अटक करून अशा प्रवृत्तीचे मूळ बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे.