बार्शी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहित महिलेचा तिच्याच विवाहीत प्रियकराने बार्शी शहरातील अलिपूर रोड येथील ज्वारीच्या शेतात तीन महिन्यापूर्वी स्कार्फने गळा आवळून केलेल्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. सदर महिला गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती.
अर्चना विनोद शिंदे (वय ३२, रा. घाटंग्री, ता. धाराशिव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. नितीन प्रभु जाधव (वय ३५, रा. घाटंग्री, ता. धाराशिव) यास अटक करण्यात आले आहे. दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अलिपूर रोड येथील शेतकरी प्रविण गव्हाणे यांनी पाणी देण्यासाठी शेतात गेले असता त्यांना उग्र वास आल्याने तेथे पाहीले असता त्यांच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह दिसुन आला.
खबर दिल्यानंतर बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, सदर महिलेच्या शरीर सडलेले होते. तिचे दोन्ही हात, उजवा पाय आणि चेहऱ्यावरील मांस नव्हते. त्यामुळे ओळख पटवणे अवघड बनले होते. घटना स्थळावरील पुरावे महिलेचे कपडे बांगड्या चप्पल जोडवे स्कार्फ आदी वस्तुवरून तपासाअंती मृत महिलेची ओळख पटली. ती धाराशिव जिल्ह्यातील अर्चना विनोद शिंदे असल्याचे निष्पन्न झाले. अर्चना शिंदे यांची काही महिन्यांपूर्वी बेपत्ता असल्याची तक्रार धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिचा पती विनोद शिंदे याच्या तक्रारी वरून दाखल करण्यात आली होती. .
नितीन जाधव याने दिलेल्या कबुलीजबाबानुसार, अर्चना शिंदे सातत्याने त्याच्यावर दबाव टाकत होती की, तिला आपल्या घरी घेऊन जावे. ती धमकी देत होती की, जर त्याने तिला स्वीकारले नाही, तर ती आत्महत्या करेल आणि त्याचे नाव पोलिसांत देईल. या वादातूनच दि. १० जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी त्याने तिला अलिपूर रोडवरील ज्वारीच्या शेतात नेले आणि तिचा गळा स्कार्पने आवळून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मोबाईल फोडला आणि घटनास्थळावरून पसार झाला.
संशयित आरोपी प्रियकर नितीन प्रभु जाधव यास पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने विविध पुरावे गोळा करून अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत नितीन जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली असून तो लेबर पुरवठ्याचे काम करत होता. त्याचे व अर्चना शिंदे यांचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याचे लग्न झाल्याने हा संबंध त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडथळा ठरत होता.