33 C
Latur
Monday, June 2, 2025
Homeमहाराष्ट्रमहिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म

महिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म

रोहिणी खडसेंनी केला व्हीडीओ शेअर...

जळगाव : राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातील एका आदिवासी महिलेला योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने भररस्त्यात बाळाला जन्म द्यावा लागला. या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

रोहिणी खडसे यांनी या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर करत भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, ‘‘आपण ऐकत आहोत की भारत जगात चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था झाली आहे, जपानलाही मागे टाकले आहे. पण या विकासाच्या गाजावाजाच्या घोषणांमध्ये, आपल्या राज्यात एक बाई रस्त्यावर बाळंत होतेय, ही किती मोठी शोकांतिका आहे!’’

चार मंत्री असलेल्या जिल्ह्याची शरमेची गोष्ट

खडसे पुढे म्हणाल्या, ‘‘ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे, जिथे चार मंत्री आहेत, पण तरीही आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर त्या महिलेला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. परिणामी तिला रस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला. हे चित्र किती भयावह आहे, यावर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे.’’
खोट्या प्रगतिशीलतेवर रोष

खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारवर रोष व्यक्त करत लिहिले, ‘‘आजही माझ्या लाडक्या बहिणीला रस्त्यावर बाळंत व्हावं लागत असेल, तर ही प्रगत भारताची जाहिरात खोटेपणाचे उत्तम उदाहरण आहे. आपण यावर मिरवण्याऐवजी लाज वाटायला हवी.’’ घटनेनंतर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि मंत्री यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

चौथा अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टिमक्या
‘‘एकीकडे आपण जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथा अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टिमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीण रस्त्यावर प्रसूत होत आहे.अजून किती दिवस माझ्या लाडक्या बहिणीची प्रगतिशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेळसांड होत राहील. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील आहे.’’ अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR