25.5 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरमांजरा साखर कारखान्याने सर्वांचे हित जपले, पुढेही जपणार

मांजरा साखर कारखान्याने सर्वांचे हित जपले, पुढेही जपणार

विलासनगर : प्रतिनिधी
देशात साखर उद्योगात नावलौकिक असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने अतिशय सूक्ष्म नियोजन  व पारदर्शकता ठेवून काम करत भविष्याचा वेध घेत वेगवेगळे प्रकल्प कार्यान्वित करुन शेतक-यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे हित जपले. यापुढेही जपणार, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ मधील गळीत हंगाम व नव्याने उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, कार्यकारी संचालक पंडित देसाई संचालक मंडळ उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गेटकेन उसाला कमी भाव देतात मात्र आपला मांजरा परिवार सर्वानाच एकच भाव देण्याचा निर्णय लोकनेते विलासराव देशमुख यांनी घेतलेला. तीच परंपरा आजही सुरु आहे. डीस्टलरीची क्षमता वाढवलेली असून शेतकरी सभासदांचा  जो विर्श्वास मांजरा परिवाराने संपादन केला आहे, तो जपवणूक करत  सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न परिवाराने केला आहे. तीच परंपरा पुढेही चालु राहील. गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
मांजरा परिवाराने काळाची गरज ओळखून नेहमीच विविध प्रकल्प कार्यान्वित करुन शेतक-यांना हेवा  वाटेल असे कार्य केले आहे.  सहकार क्षेत्राचे पवित्र जपत असताना शेतकरी सभासदांचा कारखान्यांवर असलेला विश्वास कायम ठेवण्याचे काम आजपर्यंत केले व यापुढे देखील केले जाईल असे सांगून गळीत हंगाम २०२४-२५ साठी शुभेच्छा देवुन आपला अधिक ऊस आपल्या कारखान्यास देवुन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कारखान्याने घेतलेल्या मालकीच्या दोन हार्वेस्टरचे (ऊस तोडणी यंत्राचे) पूजन करण्यात आले. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखान्याने मागील गाळप हंगामामध्ये सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संकल्पनेने जवळपास ९७ टक्के ऊसतोड हार्वेस्टरद्वारे करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्याचा मांजरा पॅटर्न निर्माण केला आहे. त्याबाबत देशभरामध्ये  या मांजरा पॅटर्नचे कौतुक होत आहे. कारखान्याकडे या अगोदर पाच हार्वेस्टर आहेत त्यामध्ये आणखीन दोन हार्वेस्टरची भर पडली आहे. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक  कैलास पाटील यांच्या हस्ते सपत्नीक श्री मांजरेश्वर हनुमान अभिषेक  गव्हाण पूजन व सत्यनारायण पूजन केले. यावेळी  कार्यक्रमास मांजरा साखर परिवारातील संस्थांचे कार्यकारी संचालक, रेणा, विलास, जागृती कारखाना, जिल्हा बँक, बाजार समितीचे संचालक मंडळ,शेतकरी, सभासद खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR