22.9 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeलातूरमाजी मंत्री अमित देशमुख यांनी अंबादास पवार यांची घेतली भेट

माजी मंत्री अमित देशमुख यांनी अंबादास पवार यांची घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
बैलजोडी नाही म्हणून स्वत:ला औताला जुंपून घेऊन महाराष्ट्रातील शेतक-यांची विदारक स्थिती जगासमोर आणणारे अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीची राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ६ जुलै रोजी दुपारी त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अंबादास पवार यांच्याकडून सद्य:स्थितीतील शेतक-यांचे प्रश्न समजून घेतल्यानंतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण शेतक-यांचा आवाज बनून विधानसभेत काम करू आणि शासनाकडून हे सर्व प्रश्न सोडवून घेऊ, असे आश्वासन त्यांना दिले. बहुतांश शेतकरी आता अल्पभूधारक झाल्यामुळे त्यांना बैलजोडी ठेवणे शक्य होत नाही, शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे यांत्रिकीकरणामार्फत शेतीची कामे करणेही अशक्य आहे. डिजिटल साक्षरता नसल्यामुळे शासनाच्या योजनांचे शेतक-यांना फॉर्म भरता येत नाहीत, तर अनेकांनी शेतकरी ओळखपत्रही अद्याप काढलेले नाही. परिणामी या योजनांचे फायदे सामान्य शेतक-यांना मिळत नाहीत, अशा समस्या त्यांनी निदर्शनास आणल्या. शेतक-यांच्या या अडचणी शासनाने अगोदर सोडवायला हव्यात, शेतक-यांचे कर्ज माफ करायला हवे, आणि विमा व इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइन फॉर्म भरण्याची व्यवस्था व्हायला हवी, अशा मागण्या पवार यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सोबत झालेल्या चर्चेत केल्या.

यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजनाथ शिंदे, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, चंद्रकांत मद्दे, संजय पवार, अनिल चव्हाण, शिवानंद भोसले, शिवानंद हेंगणे, निलेश देशमुख, गिरीश देशमुख, माधव पवार, प्रवीण सूर्यवंशी, अरबाज पठाण, पुंडलिक वंगवाड आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR