लातूर : प्रतिनिधी
शहरातील आयकॉन या खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणा-या बाळू डोंगरे या कर्मचा-याला अमानुषपणे मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना उघड झाली आहे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी २४ डिंसेबर रोजी दुपारी डोंगरे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली, कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला.
लातूर शहरातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या बाळू डोंगरे यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी बाळू डोंगरे यांच्या निवासस्थानी गेले. या भेटीत त्यांनी वडील भारत डोंगरे, आई प्रेमा डोंगरे, पत्नी छाया डोंगरे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांनी या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आणि या प्रकरणाचा कसून तपास करावा यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी पाठपूरावा करु, अशी डोंगरे कुटुंबीयांना या भेटीदरम्यान ग्वाही दिली.
यावेळी माजी महापौर अॅड. दीपक सुळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, कैलास काबळे, रवीशंकर जाधव, रत्नदीप अजनीकर, आकाश भगत, बालाजी मुस्कावाड, अशोक कदम, जावेद शेख, विकास वाघमारे, एजाज शेख, ज्ञानेश्वर बरुरे, रफीक करकम, सागर बिराजदार, अविनाश सुरवसे, सुर्यकांत सिरसाट आदी उपस्थित होते.