लातूर : प्रतिनिधी
मंगळवार दि २७ मे रोजी दुपारनंतर लातूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले आहे, रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, कांही घरात पाणी घुसले आहे. यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर लगेच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहका-यांसह खाडगाव रोड परिसर तसेच, गावभागातील खडक हनुमान परिसरात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली, नागरिकांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरुन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अशा सूचना संबंधीत यंत्रणेला त्यांनी दिल्या.
लातूर शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ठिकाणाहून आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन यंत्रणेला नागरिकांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. . झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आवश्यक ती मदत करण्यासही सांगितले आहे, आवश्यकतेनुसार काही भागात तातडीची मदत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रभाग प्रभाग १४ मध्ये गेल्यानंतर खाडगाव रोड परिसरातील राजू काळुंखे व योगेश्वरी उद्धव पाटोळे त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या घरामध्ये नाल्याचे पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे तसेच प्रभाग क्रमांक १ मधील खडक हनुमान मंदिर परिसरातही नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या त्यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथ शिंदे, लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास केंद्रे, आपतकालीन नोडल अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, माजी नगरसेवक आयुब मनियार, माजी नगरसेवक पप्पू देशमुख, प्रभाग क्रमांक १३ चे काँग्रेस पक्षाचे प्रभाग अध्यक्ष अॅड. विजय गायकवाड, पिंटू साळुंखे, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी नागरिक उपस्थित होते.