मुंबई : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ‘अॅनिमल’ फेम तृप्ती डिमरी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. या दोघी सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘माँ बहन’मध्ये आई-मुलीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत रवि किशन आणि धारणा दुर्गाही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असतील. तर, चित्रपट नेटफ्लिक्सवर थेट प्रदर्शित होणार आहे.
‘भूल भुलैय्या ३’ नंतर माधुरी आणि तृप्ती दुस-यांदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात दोघींच्या केमिस्ट्रीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे कथानक आई-मुलीच्या नात्याभोवती फिरणारे असून, यात हास्य, भावना आणि थरार यांचा समावेश आहे. चित्रपटाची शूटिंग मार्च-एप्रिल २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
‘जालसा’ नंतर दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी हा नवा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ‘जालसा’मध्ये विद्या बालन आणि शेफाली शाह यांनी अभिनय केला होता. ‘माँ बहन’ मध्ये माधुरी आणि तृप्तीची जोडी प्रेक्षकांना नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे इतर तपशील अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहेत.