इस्लामाबाद : वृत्तसंस्था
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २००० साली मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमध्ये काम करायला सुरुवात केली होती. पाकिस्तानमध्ये मायक्रोसॉफ्टचे कधीही पूर्ण कॉर्पोरेट कार्यालय नव्हते, तरीही पाकिस्तानच्या उद्योग, शिक्षण आणि सरकारी क्षेत्रांमध्ये त्यांचे भरीव योगदान आहे.
मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानच्या शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले होते. त्यांनी उच्च शिक्षण आयोग आणि पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजेस यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी केली होती. या भागीदारीतून मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा दिली जात होती. सरकारी क्षेत्रातही, मायक्रोसॉफ्टने २०० हून अधिक शिक्षण संस्थांना तंत्रज्ञानाचे उपाय पुरवले होते. याशिवाय, मायक्रोसॉफ्ट प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे आणि ऑनलाइन अभ्यासक्रम देण्यासारख्या उपक्रमांमध्येही सक्रिय होती.
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे माजी कंट्री मॅनेजर जवाद रहमान यांच्या मते, कंपनीचा हा निर्णय पूर्णपणे व्यवसायाशी संबंधित आहे. २००७ पर्यंत कंपनीशी संबंधित असलेले जवाद म्हणतात की, मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानच्या सध्याच्या अस्थिर आणि गुंतागुंतीच्या वातावरणात मोठ्या कंपन्यांना काम करणे खूप कठीण होत आहे.