बीड : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला. सतीश भोसले या व्यक्तीने दिलीप आणि महेश ढाकणे या पिता-पुत्रांना मारहाण केली. या घटनेचा व्हीडीओ समोर आल्याने हा प्रकार समोर आला. अमानुष मारहाण करणा-या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे.
मारहाण प्रकरणी ढाकणे पिता-पुत्रांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सतीश भोसले हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. तो बीडचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचेही म्हटले जात आहे. त्यावरून आता सुरेश धस यांच्यावरही कारवाई व्हावी असे बावी गावच्या ग्रामस्थांनी म्हटले आहे.
‘१९ फेब्रुवारी रोजी सतीश भोसले ढाकणे यांच्या शेतात हरण पकडण्यासाठी गेला होता. हरण पकडण्यासाठी मनाई केल्याने सतीश आणि त्याच्या सहका-यांनी दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना जबर मारहाण केली. यात दिलीप ढाकणे यांचे दात पडले, तर महेश ढाकणेचा पाय फ्रॅक्चर झाला. या घटनेला पंधरा दिवस होऊन गुन्हा दाखल झाला नाही’, अशी प्रतिक्रिया बावी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
‘ज्यावेळेस सोशल माध्यमांवर मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल झाला, तेव्हा पोलिसांनी याची दखल घेतली. सतीश भोसलेचा आका या प्रकरणावर दबाव टाकत आहे. खोक्या (सतीश भोसले) मी तुझ्या ९९ टक्के नाही तर शंभर टक्के पाठीमागे आहे, असा त्याचा व्हीडीओ आला आहे. सतीश भोसलेचा आका आष्टीचा बोका सुरेश धस आहे. फक्त भोसलेवर नाही तर आका सुरेश धसवरही कारवाई करा’ अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.