22.5 C
Latur
Wednesday, August 27, 2025
Homeमहाराष्ट्रमालवणी टाऊनशिप शाळेच्या खासगीकरणाच्या विरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक

मालवणी टाऊनशिप शाळेच्या खासगीकरणाच्या विरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेच्या खासगीकरणाच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात आली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी २३ ऑगस्ट रोजी पालक आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलने केली.

मुंबई महानगरपालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेत खासगी संस्थेला वर्ग ६ ते ८ ची व्यवस्था आणि वर्ग ९-१० साठी शिक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शाळेच्या कार्यपद्धतीत बदल होणार असून, प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या शाळेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून इमारती बांधण्यात आल्या होत्या, मात्र त्यात अधिकृत शिक्षकांची नेमणूक झाली नाही. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्याऐवजी खासगीकरणाच्या माध्यमातून उपाययोजना केली जात असल्याची टीका होत आहे.

मलाडचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. शाळेच्या शिक्षक भरतीसाठी लागणा-या जागा शासनाकडून मंजूर करून घेण्याऐवजी खासगी संस्थेला वर्ग चालवण्याची परवानगी देणे म्हणजे ‘शाळेचे खासगीकरण’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मुद्यावरून स्थानिक पालकांनीही संताप व्यक्त केला असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या हक्काशी तडजोड होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालक संघटनांनी शिक्षण क्षेत्र हे सार्वजनिक जबाबदारीचे क्षेत्र असून, ते नफा कमावण्यासाठी खासगी संस्थांच्या ताब्यात देणे चुकीचे असल्याचे मत मांडले.

सरकारचं हे कटकारस्थान हाणून पाडू : वर्षा गायकवाड
या संदर्भात वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शाळांचा मांडलेला खासगीकरणाचा बाजार या मतलबी सरकारने त्वरित बंद करावा..! बहुजनांच्या, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून दूर सारणारे हे दुटप्पी सरकार आहे. शिक्षण हा विशेषाधिकार नसून प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे आणि समाजातील सामाजिक, आर्थिक दरी दूर करण्याचा प्रमुख साधन आहे. म्हणूनच आदरणीय मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ (आरटीई) अमलात आणला. परंतु या भ्रष्ट भाजपा सरकारच्या अन्यायी राजवटीत हा मूलभूत अधिकार देखील गोरगरिबांकडून हिरावून घेतला जात आहे. भाजपच्या या गरीबविरोधी कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो. या सरकारचे हे कटकारस्थान हाणून पाडू, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR