जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील माळहीपरगा येथे शेतातील ऊसाला आग लागून सुमारे ५ एकरांवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत शेतकरी वीरभद्र गोविंद पाटील यांच्या गट क्रमांक १८ मधील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच विविध संकटांचा सामना करणा-या शेतक-याला ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान सहन करावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणेच्या देखभालीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
ऊस हे खर्चिक आणि दीर्घकालीन पीक आहे. ऊस लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतक-यांना बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी, वीज आणि मजुरीवर मोठा खर्च करावा लागतो. अनेक महिने शेतात राबून आणि कर्ज काढून शेतकरी पिकाची जोपासना करतात मात्र, आगीसारख्या दुर्घटनेमुळे संपूर्ण हंगामातील मेहनत आणि गुंतवणूक वाया जाण्याची वेळ येते. वीरभद्र गोविंद पाटील यांच्या शेतातील सुमारे ५ एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या नुकसानीमुळे आगामी काळातील आर्थिक नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना अशा घटनांमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.
शिराळा येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जाळून खाक
लातूर तालुक्यातील शिराळा गावामध्ये सौ.सुरेखा कांतीलाल खडबडे यांच्या ग.नं.११/१ मधील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. या अगामुळे शेतक-याचा दोन एकवरील ऊस जळून खाक झाल्याने ऐन दुष्काळात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतक-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र वारे असल्याने अवघ्या काही वेळात दोन एकरातील ऊस या आगीने कवेत घेतला होता. क्षेत्र कमी असले तरी या उत्पादनावरच खडबडे यांच्या शेतीचे आर्थिक गणित ठरणार होते. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवारात वीज तारा लोंबकाळत आहेत. यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे
पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी
या दुर्घटनेत नुकसान झालेल्या ऊस पिकाची संबंधित कृषी व महसूल विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा. नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शेतक-याला नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, आगीमागे विद्युत यंत्रणेतील बिघाड किंवा संबंधित यंत्रणेची निष्काळजी आढळल्यास त्याची जबाबदारी निश्चीत करून नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
















