पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सहकार, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ कार्यरत राहून त्यांनी पुण्याच्या विकासासाठी काम केले. भेगडे सुरुवातीच्या काळात मावळचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर मावळचे नगराध्यक्ष झाले. सन ७२ मध्ये जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा मावळचे आमदार झाले.
नंतर ७७ मध्ये काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर ७८ मध्ये पुन्हा आमदार झाले. विधान परिषदेवरही दोन वेळा निवडून आले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी विद्या मंदिरसारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम केले. औद्योगिक, आर्थिक विकासात योगदान देणा-या तळेगाव एमआयडीसीच्या उभारणीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.