20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeसोलापूरमिलेट सेंटर सोलापूरमध्ये उभारण्यात यावे

मिलेट सेंटर सोलापूरमध्ये उभारण्यात यावे

आ.देशमुख व शिंदेंची वििधानसभेत मागणी

सोलापूर :  सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे हलविण्याचा शासकीय निर्णय जाहीर झाल्यानंतर राजीनामा देण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला. बारामतीला जास्तीचा निधी द्या; पण मिलेट सेंटर सोलापूरमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही मिलेट सेंटरबाबत प्रश्न मांडला. हे केंद्र सोलापूरहून बारामतीला पळविण्यामागचे कारण आम्हाला अजून समजलेले नाही. ही चुकीची प्रथा असून सरकारने हे केंद्र सोलापूरमध्ये स्थापन करावे, अशी माझी हात जोडून विनंती आहे, अशी भावना आमदार शिंदे यांनी मांडली.

सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचे शासकीय परिपत्रक नोव्हेंबरमध्ये निघाले होते. त्यावेळी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. त्या वेळी देशमुख यांनी हे केंद्र बाहेर जाणार असेल तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. तोच प्रश्न आज आमदार देशमुख यांनी विधानसभेत मांडला.
माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे स्थापन करण्याबाबतचे शासकीय परित्रपक नोव्हेंबरमध्ये निघाले आहे. त्यानंतर श्री अन्न उत्कृष्टता केंद्र जाणार नाही, तर केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाणार आहे, अशी चर्चा झाली. पण परिपत्रकामध्ये प्रशिक्षण केंद्र असा उल्लेख नाही. श्री. अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरऐवजी बारामती येथे स्थापन करावे, असे परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेचे सदस्य नक्की आहेत. बारामती मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, योजना राबवा. पण, सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे सोलापूरमध्ये व्हायला पाहिजे. सरकारने हे परिपत्रक रद्द करून ते केंद्र सोलापूरमध्ये स्थापन करावे, अशी मागणी देशमुख यांनी केली.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सोलापूरला श्री अन्न उत्कृष्टता केंद्र (मिलेट सेंटर) जाहीर केले होते. पण काही दिवसांपूर्वी शासकीय परिपत्रक निघाले की, हे अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरहून बारामती येथे हलविण्यात येणार आहे. बारामतीला मिलेट सेंटर सुरू करण्याबाबत आमचा विरोध नाही. पण, सोलापूरचं पळवून बारामतीला नेण्यामागचे लॉजिक आम्हाला कळलेले नाही.
सोलापूरच्या मिलेट सेंटरमध्ये दोनशे कोटींची गुंतवणूक होणार होती आणि शेकडो हातांना काम मिळणार होते. सोलापूर हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. अर्थसंकल्पात सोलापूरला मिलेट सेंटर जाहीर करता आणि मध्येच परिपत्रक काढून दुसरीकडे हलवता, ही चुकीची प्रथा सुरू होते आहे. सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता दुसरीकडे कुठेही न हलवता सोलापूरमध्येच करावे, अशी माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, असे प्रणिती शिंदे यांनी नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR