लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे इयत्ता बारावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रका अन्वये दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी मी अशी शपथ घेतो की, मी गैरमार्गाचा अवलंब करणार नाही, अशी शपथ घेतली.
कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी – मार्च २०२५ च्या बोर्ड परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करुन सामोरे जाईन. उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचार करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा वापर करत असेल तर त्यास परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन. व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने निर्भीडपणे तणावविरहित सामोरे जाईन. व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या महाविद्यालयाचे, आई – वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन अशी शपथ दिली.
२० जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत लोकप्रतिनिधी शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अमरबजावणी करणे बाबत माहिती देणे, कॉपीमुक्त अभियानाची शपथ, शिक्षा सूची चे वाचन करणे, परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी, कशी घेता येईल, परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा लिहाव्यात याबाबत तज्ञामार्फत मार्गदर्शन, कॉपीमुक्त अभियानाच्या जनजागृतीसाठी कॉपीमुक्त घोषवाक्य सह महाविद्यालय परिसरात जनजागृती फेरी व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे असे महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये विषय सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.