22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रमुंडे यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टवरून मराठवाड्यात तणाव

मुंडे यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टवरून मराठवाड्यात तणाव

बीड : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या. या पोस्टमध्ये भावनिक पोस्टसोबतच आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल झाली होती. या आक्षेपार्ह पोस्टवरून मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ आधी पाथर्डी बंद, त्यानंतर शिरूर, परळी, वडवणी बंदची हाक देण्यात आली होती. अशातच आता सिरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासूनच बीड शहरासह आसपासच्या गावांत तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील सोशल मीडियावर होणा-या वादग्रस्त पोस्टविरोधात आज सिरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त लिखाण करण्यात आले.

या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधामध्ये यापूर्वी शिरूर त्यानंतर परळी शहर, त्यानंतर वडवणी शहर बंदची हाक देण्यात आली होती. आता या शहरांपाठोपाठ आज सिरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. ओबीसी बांधवांच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सिरसाळा शहरातील या बंदमध्ये ओबीसी समाजातील सगळ्या जाती-धर्मातील लोक सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिरसाळा शहरातून मोठी रॅली काढण्यात आली होती. काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह पोस्टवरून गदारोळ सुरू आहे.

बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण-भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचे बोलले जात होते. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हीडीओ पोस्ट केला. तसेच व्हीडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट लिहिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR