मुंबई : घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असं नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईतील एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला. वादाचे पडसाद सर्वत्र उमटल्यावर भैय्याजी जोशी यांनी त्यावर खुलासा केला.
मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतंय. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असण्याचे काहीही कारण नाही. भारताची एक विशेषता आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही.
म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचे जीवन चालतेय. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणा-यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असेच आम्हाला वाटते. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरू आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही.