मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी ‘मुंबईत प्रत्येकाला मराठी शिकण्याची गरज नाही’ असे वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राम कदम यांनी भय्याजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘‘भैय्याजी जोशी आदरणीय व्यक्ती आहेत, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की, घाटकोपरच्या काही भागांमध्ये गुजराती भाषिक लोक जास्त प्रमाणात राहतात, त्यामुळे तिथं ती भाषा प्रामुख्याने बोलली जाते. मात्र, मुंबईची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे आणि आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत मराठीच राहील.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वादावर भाष्य करताना ‘‘मी जोशींचं वक्तव्य ऐकलेलं नाही, पण महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. आम्ही कुठल्याही भाषेचा अपमान करत नाही, परंतु मराठी भाषेचा सन्मान राखला पाहिजे.’’ असे स्पष्ट केले.
भैय्याजी जोशींवर कारवाई करा : आदित्य ठाकरे
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘त्यांनी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्य सरकारने मराठी भवन आणि गिरगाव दालनही रद्द केले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. त्यामुळे भैय्याजी जोशींवर कारवाई झाली पाहिजे.’’
भैय्याजी जोशी यांनी ‘‘मुंबईत अनेक राज्यांतील नागरिक राहतात आणि वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणा-या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही’’ असे वक्तव्य केले होते. या संपूर्ण प्रकरणावरून महाराष्ट्रात मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.