मुंबई : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई बुलेट ट्रेन भूमिगत स्थानक ते महाराष्ट्र राज्यातील शिळफाटादरम्यान २१ किमी लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याच्या २१ किमीपैकी १६ किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित ५ किमी एनएटीएमद्वारे काम सुरू आहे.
यात ठाणे खाडीतील ७ किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे. मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी शाफ्ट खोली ३६ मीटर, १०० टक्के सेकेंट पायलिंगचे काम पूर्ण झाले असून, सध्या खोदकाम सुरू आहे. विक्रोळीतील शाफ्ट खोली ५६ मीटर, १०० सेकेंट पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. आजमितीस शाफ्टसाठी सुमारे ९२ टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. सावली (घणसोलीजवळ) येथील शाफ्ट खोली ३९ मीटर, १०० टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. या शाफ्टमुळे या वर्षाच्या अखेरीस खाली उतरण्याची अपेक्षा असलेले पहिले टनेल बोरिंग मशीन उपलब्ध होणार आहे.
शिळफाटा : बोगद्याचे हे एनएटीएम टोक आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत २०० मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. तसेच ३९४ मीटर लांबीचा एडीआयटी बोगदा ६ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त खोदकामासाठी दोन अतिरिक्त एनएटीएम फेसची सोय झाली आहे. या अतिरिक्त प्रवेशामुळे ७०० मीटरहून अधिक भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.