27.1 C
Latur
Thursday, May 29, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई एपीएमसीत तीन दिवसांपासून भाजीपाला पडून

मुंबई एपीएमसीत तीन दिवसांपासून भाजीपाला पडून

मुसळधार पावसाचा फटका शेतकरी, व्यापारी अडचणीत

नवी मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भाजीपाल्याला फटका बसला असून मुंबई एपीएमसीत भाज्यांची आवक घटली आहे. मार्केटमध्ये आलेल्या मालाला उठाव नसल्याने मागील तीन दिवसांपासून विक्रीसाठी आलेला भाजीपाला पडून आहे. परिणामी शेतक-यांसह व्यापारीही अडचणीत सापडले असून यात माल खराब झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि व्यापा-यांना मोठा फटका बसत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे वाशीतील भाजीपाला मार्केटमध्ये मालाची आवक कमी झाली असून, भाजी खरेदी करण्यासाठी येणा-या ग्राहकांचीही रेलचेल कमी झाली आहे. परिणामी शिल्लक भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापा-यांवर आली आहे. व्यापा-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात ४४९ गाड्यांची आवक झाली असली तरी खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याची स्थिती आहे.

पालेभाज्यांचे दर ४० टक्क्यांनी झाले कमी
चांगल्या प्रतीचा माल चढ्या दराने विकला जात असला तरी या शेतात बराचसा माल भिजल्याने खराब झाला आहे. अशा भाजीपाल्याच्या दरांवर परिणाम झाला असून अनेक भाज्यांचे दर झपाट्याने कमी झाले आहेत. विशेषत: पालेभाज्या शेतातूनच भिजून आल्याने बाजारात येईपर्यंत खराब झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले आहेत. व्यापा-यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असून, याचा परिणाम थेट बाजारात जाणवतो आहे.

दर आणखी खाली येण्याची शक्यता

गि-हाईकाने पाठ फिरवल्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला पडून आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीतला माल बाहेर फेकून देण्याची वेळ आली आहे. तर येणा-या काही दिवसांतही दर तळाला येण्याची शक्यता कमी असून, दरवाढ कायम राहू शकते, असा अंदाज व्यापा-यांनी वर्तवला आहे. पावसामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा फटका सामान्य ग्राहकांपासून व्यापा-यांपर्यंत सर्वांनाच बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR