कोल्हापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी पहिल्या रेल्वेचा कोल्हापुरात आज शुभारंभ झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला. १०.३५ वाजता ही पहिली ट्रेन अयोध्येला रवाना झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ८०० लाभार्थी या रेल्वेतून प्रवास करत आहेत. लॉटरीद्वारे या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. महायुती सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.
राज्यातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणा-या ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेकरता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी २ हजार १४६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ९८३ अर्ज पात्र झाले असून त्यामधील ८०० लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले होते. हे ८०० लोक आज आयोध्येला रवाना झाले. या योजनेचा लाभ घेणारा कोल्हापूर हा राज्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.
काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले ६० वर्षांवरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तीर्थयात्रा योजनेंतर्गत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला जास्तीत जास्त ३०,००० रुपयांचा लाभ मिळतो.