मुरुड : प्रतिनिधी
येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती येथील मुरुड सहकारी पुरुष बचत गटाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली. जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध कार्यालयातील कर्मचारी, प्रतिष्ठीत नागरिक, विद्यार्थ्यांना संभाजी राजे यांच्या कार्याची ओळख करून देणा-या चारशे पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.
महापुरुषांची जयंती ही त्यांनी केलेल्या कामाला त्यांच्या विचारांना व संघर्षाला उजाळा देण्यासाठी व त्याचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी साजरी केली जावी. महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचणयापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यावेत या विचाराने मुरुड येथील मुरुड सहकारी कृषी बचत गटाने छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपतींचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा मानस केला. छञपती संभाजी महाराज यांचे कार्य व विचार प्रगट करणारे ‘साहित्यीक संभाजी महाराज’ या पुस्तकाच्या ४०० प्रतींचे वाटप करण्यात आले.
बचत गटाच्या सदस्यांनी शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, उस्मानाबाद जनता सहकारी बँक, बँक ऑफ बडोदा, यासह विविध बँका विविध शासकीय कार्यालय या ठिकाणी असणा-या कर्मचा-यांंना, शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांना, वाचनाची आवड असणा-या होतकरू विद्यार्थ्यांना या पुस्तकाचे वाटप केले. हा उपक्रम राबवण्यासाठी मुरुड सहकारी बचत गटाच्या आकाश मोरे, दिनेश नाडे, दत्ता शिंदे, संदिप माळी, चंद्रसेन ंिहगले,अविनाश कदम, वैजनाथ कणसे, लालासाहेब मोरे, किशोर मोरे, मोहित बिराजदार, अजय माळी यांनी पुढाकार घेतला