पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथून वाहणारी मुळा नदी रसायन मिश्रित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. नदीतून वाहत असलेल्या पाण्यावर पूर्णपणे पांढराशुभ्र फेस आलेला दिसत आहे. आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांमधील रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्याने नदीतील जीव तसेच मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथून प्रवाहित असलेल्या मुळा नदीपात्रामध्ये आजूबाजूच्या काही कंपन्यांनी प्रक्रिया न केलेले रसायन मिश्रित पाणी सोडले आहे. तसेच मैला मिश्रित पाणी सोडल्याने मुळा नदी पात्र मोठ्या प्रमाणात फेसाळले आहे. रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित पाण्यामुळे विशालनगर येथील मुळा नदीवरील चोंधे पाटील बंधारा देखील मोठ्या प्रमाणात फेसाळला आहे. अर्थात या सर्व प्रकारामुळे नदीतील पाणी दूषित झाले आहे.
नदी पात्र फेसाळल्यामुळे मुळा नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने जलचर तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. त्यामुळे मुळा नदी पात्रात रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित पाणी सोडणा-या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते रविराज काळे यांनी केली आहे.