शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
अवकाळी पाऊस थांबून चार दिवस गेल्यानंतर मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वी एक दिवस अगोदर ७ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काही भागात मृगधारा बरसण्यास सुरूवात झाली. या पावसाने शेत मशागतीच्या कामाला गती येणार असून नागरिकांना मात्र काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने कहर केला. कांदा, कोथिंबीर, भाजीपाला व फळे उत्पादक शेतक-यांना अवकाळीचा फटका बसला. त्यानंतर काही दिवस अवकाळी पाऊस थांबला होता. अशात शनिवारी मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. तालुक्यातील काही भागात सायंकाळी वादळी वारा व मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस बरसला.
दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीपासून तालुक्यात मान्सूसून पुर्व अवकाळी पावसाने अक्षरश: हैदोस घातला होता. सततच्या अवकाळी पावसाने पेरणी पुर्व मशागत थांबली होती. तर उन्हाळी पिकांबरोबर ऐन लग्न सराईत या अवकाळी पावसाचा व्यापारी व नागरिकांना देखील देखील फटका बसला. गेली चार दिवसात अवकाळी पावसाने उसंत घेतल्याने काही प्रमाणात पेरणी पुर्व मशागतीची कामे झाले. मात्र आणखी मोठ्या प्रमाणात शेती कामे शिल्लक आहेत. मे महिन्यात पडणारा पाऊस पाहता मृगात पाऊस पडणार की नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करत होते. मात्र मृग नक्षत्र निघण्याच्या एक दिवस अगोदर पाऊस पडल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.